‘शिंदे गटात सातशे कार्यकर्त्यांसह प्रवेशाचा पुरुषोत्तम जाधव यांचा दावा फसवा…’
सातारा (महेश पवार):
राज्याच्या राजकारणात बंडखोर शिंदे गटविरुद्ध मूळ शिवसेना गट यांच्यातील सत्ता संघर्ष उफाळून येताना दिसत आहे .शिवसेना फोडण्यासाठी जिल्हावार माणसे नेमण्यात आल्याची चर्चा सगळीकडेच रंगत आहे.
शिवसेना मा. जिल्हाप्रमुख व भाजपवासी झालेले पुरुषोत्तम जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकासमवेत सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सातारा जिल्ह्यातील सातशे शिवसैनिक, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याबाबत घोषणा करून शिवसेनेला खिंडार पडल्याचे जाहीर केले होते .
याच पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पुरुषोत्तम जाधव यांच्या खंडाळा तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी शिवसेनेला खिंडार पडल्याचा पुरुषोत्तम जाधव यांचा दावा फसवा असून खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सोबतच असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांनी केले.
शिवसेना संघटनात्मक बांधणी , शिवसेना सभासद नोंदणी अभियान , आगामी निवडणुका या विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खंडाळा तालुका व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकाऱ्यांचे बैठक 19 जुलै 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता खंडाळा येथे संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये सर्वप्रथम पुरुषोत्तम जाधव यांनी 700 शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असले बाबत व शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील तसेच पदाधिकाऱ्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आला व साताराच नाही तर खंडाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक दलबदलू नेत्यांच्या मागे न धावता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे जाहीर करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी खंडाळा तालुका शिवसेना पदाधिकारी बांधील असल्याबाबतचा ठराव सदर बैठकीत घेण्यात आला . उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना सक्रिय सभासद नोंदणी फॉर्म भरून सदर सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला . सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून संघटनात्मक बांधणी मजबूत करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला ५०,००,००० सभासद नोंदणीचा संकल्प पूर्ण करणेसाठी २०,००० नवीन सक्रिय सभासद नोंदणी करण्याचा संकल्प जाहीर केला व सातारा जिल्हा शिवसेनेत फूट पडल्याची बातमी केवळ अफवा असून कोणाच्याही भुलभुलय्यांना बळी न पडता केवळ संघटना बळकटीकडे सर्वांनी लक्ष द्यायचे ठरवण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा महिला संघटिका शारदा जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप दादा माने, तालुकाप्रमुख संतोष मुसळे, आदेश जमदाडे व अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा महिला आघाडी संघटिका शारदा जाधव ,उपजिल्हाप्रमुख अजित यादव ,माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप दादा माने ,तालुकाप्रमुख आदेश जमदाडे ,संतोष मुसळे, युवा अधिकारी समीर वीर, महिला आघाडी संघटिका कल्पना पवार, विभाग प्रमुख सागर ढमाळ ,सागर कदम ,अभय ननावरे, खंडाळा शहर प्रमुख गोविंद गाढवे, उपशहर प्रमुख प्रमोद शिंदे मा. शहर प्रमुख मंगेश खंडागळे ,अमोल गाढवे, वाई शहरप्रमुख किरण खामकर ,माजी सचिव दत्तात्रय राऊत यांचे सह अनेक पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जाधव यांचा दावा फसवा की बैठकीच्या माध्यमातून बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा कौल खरा हा प्रश्न खंडाळ्यातील राजकीय धोरणांना पडला आहे