कर्मचाऱ्यांना सरकारचे खास चवथीचे गिफ्ट
गोवा सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना खास चतुर्थी गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याचा पगार 24 तारखेला दिला जाणार आहे. सरकारकडून यासंदर्भात एक परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे.
गोवा सरकारकडून प्रणव भट यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे, ज्यात गोवा सरकारकडून राजपत्रित आणि अराजपत्रित सरकारी अधिकारी, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, तसंच स्वातंत्र्यसैनिकांनाही मिळणारं वेतन आणि भत्ते 24 ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
पगार लवकर होणार असल्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांनी त्यांची बिलं वेळेत जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. वेतन लवकर होणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं चित्र आहे.