माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
माणमध्ये सुरु असलेल्या वाळू उपशाबाबत एका स्थानिक वृत्तपत्राने सातत्याने आवाज उठवला होता. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या कॉल रेकॉर्डिंग प्रकरणाची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी करत त्यांना साताच्यात नेमणुकीविना ठेवले होते. शिवाय याच प्रकरणात पाच तलाठ्यांवर ही निलंबनाची कारवाई झाली होती.
वाकी येथील नदीपात्रात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी व पोलीस पथकाने कारवाई करत वाळू मफियांना रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी माफिया तसेच तहसीलदार, निलंबित तलाठी यांच्यात वाहने सोडण्याबाबत व देण्या घेण्याबाबत झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी याबाबत खुलासा न देता आल्याने येवले यांनी ‘उचलबांगडी करण्यात आली होती. हाच प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला होता. काही महिन्यांनी येवले परत माण तालुक्यात रुजू झाले होते. त्यामुळे वाळू माफिया खुश होते. पुन्हा उपसा देखील सुरू झाला होता. याच दरम्यान सरकार बदलले आणि नवे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी अहवालानुसार येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.