माधव गडकरींच्या जयंतीदिनी रविवारी पणजीत कार्यक्रम
पणजी, ता. २३ (प्रतिनिधी)
झुंझार पत्रकार माधवराव गडकरी यांची ९४वी जयंती येत्या रविवारी, २५ सप्टेंबर रोजी पणजीत साजरी होणार आहे. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत. त्यांना महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रांमध्ये संपादक पदावर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रमाकांत खलप असतील.
गोव्यातील मराठी पत्रकारांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोविड महामारीच्या आधी पणजीतच गडकरींची जयंती साजरी करण्यात आली होती. गोव्यात गडकरी यांनी ‘गोमन्तक’चे संपादक म्हणून दहा वर्षे काम केले. तत्पूर्वी जनमत कौलाच्या काळात ते प्रचारासाठी गोव्यात आले होते.
गोव्यातील वास्तव्यात त्यांनी लिहिलेले ‘असा हा गोमंतक’ हे सचित्र पुस्तक खूपच गाजले असून, एवढे वैशिष्ट्यपूर्ण गोव्यावरील पुस्तक क्वचित असेल. गडकरी यांनी त्यानंतर मुंबईतील वृत्तपत्रांमध्ये दीर्घकाळ संपादक म्हणून काम केले असले तरी त्यांच्या भाषणांतून व लेखनातून ते गोव्याच्या आठवणी काढीत. मुंबईत असतानाही त्यांनी गोव्याच्या सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुक्त गोव्याच्या वृत्तपत्रांच्या जडणघडणीत गडकरींची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे गडकरींचे नाव मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात अजूनही आदराने घेतले जाते.