T 20 world cup : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ गड्यानी विजय
टी 20 वर्ल्डकप ग्रुप 2 मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचे 5 विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या भाबड्या आशेवर पाणी फिरले.
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 134 धावांचे आव्हान ठेवले होते. खराब सुरूवातीनंतर एडिन माक्ररम (51) आणि डेव्हिड मिलर (46 चेंडूत नाबाद 59 धावा) यांनी डाव सावरत झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचे आव्हान षटकात पार केले. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 तर हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत झुंजार 68 धावा केल्या. या खेळीच्या जोरावरच भारत 133 धावांपर्यंत पोहचू शकला.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकात 9 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गिडीच्या भेदक माऱ्यासमोर भारताची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 40 चेंडूत 68 धावांची खेळी करत भारताला शतकी मजल मारून दिली. रोहितने 15 तर विराटने 12 धावा केल्या. या तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने 4 तर वेन पार्नेलने 3 विकेट्स घेतल्या.