पाकिस्तानला नमवत इंग्लंडने जिंकला वर्ल्डकप
अष्टपैलू बेन स्टोक्स याने निर्णायक क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवून वर्ल्डकपवर इंग्लंडचे नाव कोरले आहे. इंग्लंडने एक ओव्हर आणि 5 गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.
इंग्लंडने 2019 चा वनडे वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता टी 20 वर्ल्डकप जिंकत इंग्लंडने इतिहास रचला. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने नाबाद 52 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला. 138 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पाकिस्ताननेही पॉवर प्लेच्या सुरूवातीला दोन धक्के दिले. शाहीन आफ्रिदीने अॅलेक्स हेल्सचा अवघ्या 1 धावेवर त्रिफळा उडवला तर चौथ्या षटकात हारिस रौऊफने फिलिप सॉल्टला 10 धावांवर बाद केले. इंग्लंडचा डाव एकहाती सांभाळून आक्रमक सुरूवात करणाऱ्या जॉस बटलरला हारिस रौऊफने 26 धावांवर बाद केले. बटरलने 17 चेंडूत 26 धावा करत इंग्लंडला पाच षटकात 43 धावांपर्यंत पोहचवले होते.
पाकिस्तानच्या कसलेल्या गोलंदाजांनी दमदार मारा करत इंग्लंडला फार धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर शादाब खानने 23 चेंडूत 20 धावा करणाऱ्या हॅरी ब्रुक्सला बाद केले. यामुळे बॉल टू रन असलेला सामना आता 15 व्या षटकात 30 चेंडूत 41 धावा असा आला. त्यानंतर बेन स्टोक्स याने निर्णायक क्षणी फटकेबाजी धावगती वाढवली. त्याने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याला मोईन अलीचीही साथ मिळाली. पण 19 व्या षटकात मोईन अली (19 धावा) आऊट झाला. तथापि, बेन स्टोक्सने दडपण न घेता एक ओव्हर राखूनच इंग्लंडला विजय मिळवून दिला.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने 32 धावा केल्या.