‘बेतुल किल्ल्यावर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा’
केपें :
गोव्यातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे. सासष्टी तालुक्यातील बेतुल किल्ल्याचा जिर्णोद्धार करुन तेथे थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी केली आहे.
साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई हेही यावेळी उपस्थित होते.
सदर किल्ल्याचा परिसर सीमाशुल्क विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावा अशी माझी मागणी आहे. केपें मतदारसंघातील लोकांना पूर्वीच्या आमदाराने बेतुल किल्ला कस्टम्सच्या नियंत्रणातून काढून टाकण्याचे केवळ तोंडी आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात काहीही केले गेले नाही, असा आरोप एल्टन डिकोस्ता यांनी केला.
बेतुल किल्ला १६७९ मध्ये थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेला. या ऐतिहासिक वास्तूचा जिर्णोद्धार करुन सदर जागा संरक्षित करणे गरजेचे आहे असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.
बेतुलचा हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला आणि गोवा मुक्तीपर्यंत त्यांच्याच ताब्यात राहिला. किल्ल्यावर एक तोफ आहे. सरकारने हा किल्ला “संरक्षित स्थळ” म्हणून घोषित केला आहे, परंतु त्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असा दावा एल्टन डिकोस्ता यांनी केला.
बेतुल किल्ला हे एक पर्यटन स्थळ आहे. किल्ल्यावर भेट देणाऱ्यांना समोर साळ नदी आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. या किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्यास या भागातील पर्यटनाला चालना मिळेल. मला आशा आहे की सरकार छत्रपती शिवाजींच्या वारशाचा आदर करण्यासाठी त्वरीत पाऊले उचलेल, असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.