भाजपा खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.
आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. अत्यंत दु:खद अशी घटना आज घडली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते, आजाराशी झुंजत होते. ते अत्यंत झुंजार असे व्यक्तिमत्व होते. एका फायटरप्रमाणे ते लढले. पण आज त्यांची झुंज थांबलीये, अशी प्रतिक्रिया जगदीश मुळीक यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, अशा शब्दांत अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.