उद्धव ठाकरेंना मिळाले ‘हे’ चिन्ह आणि पक्ष नाव
मुंबई:
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावावरून रस्सीखेच सुरू आहे. आपल्या पक्षाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव मिळावं, अशी मागणी दोन्ही गटांकडून केली होती. आज अखेर निवडणूक आयोगानं ‘बाळासाहेबांची शिवसेना ‘ हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे.
दुसरीकडे, निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्हांबाबतही निर्णय दिला आहे. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. पण शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिली आहेत. शिंदे गटाने उद्या सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत, त्यानंतर शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आयोग निर्णय घेणार आहे.
त्रिशूळ’ हे धार्मिक चिन्ह आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार हे चिन्ह राजकीय पक्षाला देता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या चिन्हावर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. तर ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह डीएमकेचं निवडणूक चिन्ह आहे. ते एका राजकीय पक्षाचं वापरातील चिन्ह असल्याने निवडणूक आयोगानं ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह अमान्य केलं आहे. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून निवडणूक आयोगानं ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला दिलं आहे.