कर्नाटकात भाजपाला मिळणार धक्का, काँग्रेस येणार सत्तेवर ?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आज ( २९ मार्च ) निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १० मे ला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशात ‘एबीपी न्यूज’चा एक सर्वे समोर आला आहे. यात भाजपाचा पराभव होत असून, काँग्रेस सत्तेवर येत असल्याचं दाखवलं आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरने एकत्ररित्या सर्वे केला आहे. यात काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. सर्व्हेत २४ हजार ७५९ हजार लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. त्यानुसार काँग्रेसला ११५ ते १२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८ ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जनता दल सेक्यूलरला २३ ते ३५ उमेदवार निवडून येऊ शकतात.”
मेटेरोइज पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेसला ८८ ते ९८ जागा, भाजपाला ९६ ते १०६ आणि जेडीएसला २३ ते ३३ जागा मिळू शकतात. लोक पोलच्या सर्व्हेत काँग्रेसला ११६ ते १२३, भाजपाला ७७ ते १२३ आणि जेडीएसला २१ ते २७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना १ ते ४ जागा मिळतील.
पॉप्युलर पोल्सच्या सर्व्हेत काँग्रेसला ८२ ते ८७ जागा मिळताना दिसत आहेत. भाजपाला ८२ ते ८७ आणि जेडीएसला ४२ ते ४५ जागा मिळू शकतात. कर्नाटक पोल्सच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला १०० ते १०८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला ८१ ते ८९ आणि जेडीएसला २७ ते ३५ आणि अन्य पक्षांना १ ते ३ जागा मिळतील, असं दिसत आहे.