‘…’हे’ म्हणजे सरकार गुटखा माफियाला प्रोत्साहन देत असल्याचीच पुष्टी’
मडगाव:
कोलवा आणि कळंगुट समुद्रकिनाऱ्यांवर पसरलेली गुटख्याची हजारो पाकीटे आणि भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून हाती घेण्यात आलेल्या बीच क्लीनिंग मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी पुन्हा एकदा गोव्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे , बीच क्लीनिंग कंत्राटात घोटाळा झाला आहे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार गोव्यात गुटखा माफियांना प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे असे काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो म्हटले आहे.
रविवार 21 मे 2023 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, गोवा राज्य जैव विविधता मंडळ आणि गोवा राज्य हवामान बदल विभाग यांनी आयोजित केलेल्या समु्द्र किनारे स्वच्छता मोहीम कार्यक्रमावर प्रतिक्रिया देताना, मोरेनो रिबेलो यांनी भाजप सरकारच्या “मिशन टोटल कमिशन” ने गोवा राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
भाजप सरकार समुद्रकिनारा स्वच्छतेच्या कंत्राटावर जवळपास 35 कोटी रुपये खर्च करत आहे. दुर्दैवाने प्रत्येक वेळी जेव्हा स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संस्थांद्वारे समुद्र किनारे स्वच्छता मोहिम हाती घेतली जाते तेव्हा समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग दिसतात. कंत्राटदार त्याचे काम समाधानकारकपणे करत नसल्याने असे घडते, असा दावा मोरेनो रिबेलो यांनी केला.
राज्यात गुटखा विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी असली तरी समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची पाकीटे सापडली आहेत. यावरून आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांचे गोव्यातील गुटखा साठेबाजांशी संगनमत असल्याचे उघड आले आहे. भाजप सरकार तरुण पिढीला संपवण्याच्या तयारीत आहे, असे मोरेनो रिबेलो म्हणाले.
सरकार बीच क्लीनिंग कॉन्ट्रॅक्टवर करोडो रुपये खर्च करत असताना G20 प्रेसिडेंसीला गोव्यात बीच क्लीनिंग मोहिम हाती घ्यावी लागली ही लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रख्यात विनोदी कलाकार भारती सिंग यांनी गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ राखण्यात भाजप सरकारचे अपयश उघडकीस आणले याची लाज पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना वाटली पाहिजे, असे मोरेनो रिबेलो यांनी म्हटले आहे.