मॉडेल इंग्लिश हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दामोदर कवळेकर यांचे निधन
मडगाव :
मॉडेल इंग्लिश हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दामोदर कवळेकर यांचे शुक्रवार 2 जून 2023 रोजी निधन झाले. त्यांचा जन्म 1 मे 1932 रोजी झाला होता. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, 3 जून 2023 रोजी दुपारी 4 वाजता पाजीफोंड- मडगाव येथे मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते स्वातंत्र्यसैनिक कुमुदिनी कवळेकर यांचे पती होते आणि त्यांनी शिक्षण, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यांचे राहणीमान अत्यंत साधेपणाचे होते आणि जगभरातील त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना खूप आदर व मान होता.
त्यांच्या पश्चात सुचिता राजेंद्र नाईक आणि अचला अनिल प्रभू या दोन मुली तसेच परेश आणि शर्मिला, हेमंत आणि राधा हे पुत्र व सुना तसेच सारिका, श्रेया, दिवंगत दत्तराज उर्फ बंटी, सनील, ग्रीष्मा, ऋषभ अशी नातवंडे आणि पणती सावी असा परिवार आहे.
गोव्याचे नेते पुरुषोत्तम काकोडकर, स्वातंत्र्यसैनिक शरद गुडे आदी सोबत त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. मात्र, तुरुंगवासाची शिक्षा न झाल्यामुळे त्यांनी सरकारकडे स्वातंत्र्य सैनिक म्हणून नोंदणी करण्यास नकार दिला होता.
दामोदर कवळेकर यांच्या निधनाबद्दल मॉडेल इंग्लिश हायस्कूलच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.