शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून ‘इतके’ कोटी
सातारा (महेश पवार) :
पोवई नाका येथील छ. शिवाजी महाराज पुतळा परिसर अर्थात शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचे काम निधी अभावी रखडले होते. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून या कामासाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ८ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याने हे काम आता लवकर मार्गी लागणार आहे. या संदर्भात आढावा घेऊन तातडीने शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम चालू करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
ऐतिहासिक शिवतिर्थाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा राज्य शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता. पाठपुराव्यानंतर भरीव निधी उपलब्ध झाला असून त्यानिमित्ताने या कामाचा आढावा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी आज घेतला. यावेळी पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. शिवतीर्थ सुशोभीकरण कामाचे रेखानकाशे व अंदाजपत्रक तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे कामाची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून काम तातडीने सुरु करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी चिद्रे यांना दिल्या.
दरम्यान, शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम करताना हे संपूर्ण काम ऐतिहासिक वास्तुकलेचा अनोखा नमुना ठरावा अशा पद्धतीने इतिहासकालीन वास्तू लूकमध्ये केले जाणार आहे. शिवतीर्थ सुशोभीकरणाचे डिजाईन पाहून या होणाऱ्या संपूर्ण कामाचा आढावा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. काम लवकर चालू करा. काम दर्जेदार करून लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या.