ईद, अक्षयतृतीयानिमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन
रमजान ईद अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती असा दिवस 33 वर्षात एकदाच येत असल्याने हडपसर येथील हिंदू-मुस्लिम बांधवांना एकत्र येवून मशीदीच्या व्यासपीठावरच ऐक्याचे अनोखे दर्शन घडवत एक नवा आदर्श सर्व समाजासमोर ठेवला आहे.
प्राचीन मशीदीच्या इतिहासात प्रथमच हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवांचे गुलाब फूल देवून शुभेच्छा दिल्या. आलमगीर मशीद ट्रस्ट अल्पसंख्यांक शैक्षणिक चळवळ व डॉ. ए.पी.जे.कलाम ह्या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या वेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी ह्यांनी राजकारण बाजूला ठेवून ‘गावाचे गावपण’ अबाधित राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. तर मुस्लिम बांधवांनी शासनाचे सर्व नियमांचा आदर ठेवत प्रशासनाला सदैव मदतीची हमी देण्यात आली. मशिदीचे प्रमुख ट्रस्टी व मौलाना फारूक इनामदार ह्यांनी मा. नगरसेवक सुनिल दादा बनकर मारूती आबा तुपे व योगेश ससाणे ह्यांचे स्वागत व सत्कार शाल देत करण्यात आला.
यावेळी आर.पी.आय. महिला नेत्या शशिकला वाघमारे, अल्पसंख्याक शैक्षणिक चळवळीचे संस्थापक व साहित्यिक अस्लम जमादार, हडपसर पोलीस स्टेशन पी.एस.आय, आलमगीर ट्रस्टचे प्रतिनिधी सामाजीक क्षेत्रातील अनेक मान्यवर व मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. ह्या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण गावात ‘रंगतदार’ ठरल्याचेच दिसून येत होती.