पणजी :
बहुजन समाजाचे नेते गिरीश चोडणकर यांची काँग्रेस कार्यकारिणीवर स्थायी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस समितीने अभिनंदन केले आहे.
“राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि समर्थकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण गिरीश चोडणकर सारख्या सामान्य माणसाला कार्यकारी समितीवर स्थान मिळाले आहे. या समितीवर अनेक प्रमुख नेते देशाच्या उन्नतीसाठी भूमिका बजावत आहेत आणि त्यात गोव्याला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या बद्दल मी आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे,” असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.
“गेल्या अनेक वर्षांपासून गिरीश चोडणकर हे बहुजन समाजाच्या हितासाठी काम करत आहे. आपल्या नेत्याला केंद्रीय स्तरावर संधी देणे हा या समाजाचा सन्मान आहे,” असे पणजीकर म्हणाले.
सुरुवातीला बुथ प्रमुख असलेले गिरीश चोडणकर यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निष्ठा आणि कामगिरीने प्रभावित होऊन, राहुल गांधींनी त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस समितीवर सचिव म्हणून पदोन्नती दिली आणि एनएसयुआयचे प्रभारी म्हणून जबाबदारीही दिली. नंतर त्यांची गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना ‘हाथ से हाथ जोडो’ कार्यक्रमासाठी तेलंगणा राज्याची जबाबदारीही देण्यात आली होती. ते गोवा खो खो असोसिएशन आणि उच्च माध्यमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. चोडणकर यांनी यापूर्वी ‘गोवा ऑलिम्पिक असोसिएशन’चे उपाध्यक्ष म्हणूनही योगदान दिले आहे.