‘भंग-अभंग’, ‘फुटूच लागतात पंख’चे प्रकाशन
पणजी :
प्रसिध्द मराठी लेखक-कवी डॉ. सुधीर देवरे यांच्या ‘भंग अभंग’ आणि ‘फुटूच लागतात पंख’ या सहित प्रकाशनच्यावतीने प्रकाशित दोन मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच बंगलोर येथे अनौपचारिक कार्यक्रमात झाले. हॉलिवूड तसेच तेलुगू सिनेमांचे प्रसिध्द वीएफएक्स तज्ज्ञ वी. चंद्रप्रकाश यांच्या हस्ते या दोन्ही संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सहित प्रकाशनचे व्यवस्थापकिय संपादक तथा सिनेलेखक-दिग्दर्शक किशोर अर्जुन यांची उपस्थिती होती.
कविता ही व्हीएफएक्स कलेसारखीच असून कवीच्या मनातील अतिवास्तवाला वास्तवाच्या जवळ घेऊन येते असे व्ही. चंद्रप्रकाश यांनी यावेळी नमूद केले. तेलुगू आणि मराठी भाषेचे ॠणानुबंध हे खूप जुने असून मी ज्या शहरातून येतो त्या हैदराबादमध्ये मराठी साहित्याचा वावर मोठा आहे. अशावेळी मराठीतील गाजत असलेल्या काव्यसंग्रहाचे अनौपचारिक प्रकाशन माझ्या हस्ते होते आहे, याचा मला विशेष आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
भंग अभंग आणि ‘फुटूच लागतात पंख’ या दोन्ही काव्यसंग्रहात सुधीर देवरे यांच्या 1980 ते 2021 या काळादरम्यानच्या निवडक कवितांचे संकलन असून, ‘भंग अभंग’तील कविता म्हणजे ’भंगलेल्या समकालाचे खोलवर दडलेले वास्तव’ असल्याचे डॉ. किशोर सानप यांनी आपल्या प्रस्तावनेत नोंदवला आहे. तर ‘फुटूच लागतात पंख’ तील कविता ही ‘आजच्या एकविसाव्या शतकातील नव्या पिढीची ज्ञानवादी-व्यवहात्मक आणि ‘सामाजिक’ समजुतीची असल्याची नोंद या संग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ. शशिकान्त लोखंडे यांनी केला आहे.