‘पुरुष मंत्र्यांनी त्यांच्या पत्नींसाठी ‘हा’ त्याग करावा…’
पणजी:
भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी महिला आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात नकार दिल्याने त्यांचा पक्ष महिलांच्या सशक्तीकरणासाठी खऱ्या अर्थाने कटिबद्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या तीन महिला आमदारांचा पुरुषप्रधान मंत्रिमंडळात समावेश करण्याची सध्याची वेळ योग्य नाही का? असा प्रश्न काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
भाजप एका कुटुंबाला दोन मंत्रिपद देऊ शकत नाही, या तानवडे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना चोडणकर म्हणाले की महिला सशक्तीकरणाबाबत त्यांची उणीव दिसून येते. “तानावडे यांचा महिला आमदारांच्या क्षमतेवर विश्वास असेल, तर विश्वजित राणे आणि बाबूश मोन्सेरात यांसारख्या पुरुष मंत्र्यांनी स्वेच्छेने मंत्रीपद सोडले पाहिजे आणि त्यांच्या पत्नींना त्याचा लाभ दिला पाहिजे. माजी मंत्री आमदार जेनिफर मॉन्सेरात यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले हे निराशाजनक आहे,” असे ते म्हणाले.
महिला आमदारांना मंत्रिमंडळात हक्काचे स्थान नाकारल्याने भाजपचे ‘जुमला’ राजकारण उघड होत असल्याचे चोडणकर म्हणाले.
“पहिल्यांदा आमदार असल्याच्या नावाखाली त्यांना मंत्रिपदे न देणे हे अन्यायकारक आहे, विशेषत: भाजपमधील अनेक पुरुष आमदार आणि खासदारांना त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री म्हणून नियुक्त केले गेले आहे. डॉ प्रमोद सावंत मंत्री न होता मुख्यमंत्री होऊ शकतात तर पहिल्यांदा आमदार झालेली महिला मंत्री का होऊ शकत नाही? असा प्रश्न चोडणकर यांनी केला.
ते म्हणाले की, महिला आरक्षण आणि समानतेबाबत भाजपची अनास्था दिसून येते. ते म्हणाले, “त्यांनी तत्परता दाखवली असती, तर त्यांनी महिला आमदारांना मंत्रीपद भूषवण्याची संधी दिली असती आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली असती,” असे ते म्हणाले.
“जनगणना आणि डिलिमेटशनच्या बहाण्याने भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक मतदारसंघात ५०% महिला मतदार असल्याने, महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी नव्याने जनगणनेची सध्या गरज नाही. कॉंग्रेस सरकारने २०११ त केलेली जनगणना हे विधेयक लागू करण्यात पुरेसे आहे ,” असे ते म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. “मी अभिमानाने सांगतो की निर्मला सावंत यांना त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान आदराने वागवत आम्ही समानतेचे तत्त्व कायम ठेवले आहे. याउलट, विशेषत: एलपीजीच्या किमती वाढल्यानंतरही भाजप महिलांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला त्यांच्या फसव्या ‘जुमल्यां’ची चांगलीच जाणीव आहे आणि ते अशा डावपेचांना बळी पडणार नाहीत,” असे चोडणकर म्हणाले.
“भाजप अध्यक्ष तानावडे पत्रकार परिषदेत 22 मिनिटे बोलले, तर आमदार देविया राणे यांना केवळ दोन मिनिटे देण्यात आली. प्रत्येक सुशिक्षित महिला आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. गोवा विधानसभेतील त्यांच्या महिला आमदारांवर भाजपचा स्पष्ट विश्वास नसल्यामुळे महिलांच्या हक्कांसाठीच्या त्यांच्या बांधिलकीवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत,” असे ते म्हणाले.