Ravindra berde : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन
Ravindra berde : मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde ) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
तीनशेहून अधिक मराठी चित्रपटातून काम केलेले अभिनेते रवींद्र बेर्डे गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर होते, मात्र चांगले नाटक, चित्रपट ते आवर्जून पाहत असत. १९९५ साली ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. २०११ पासून ते घशाच्या कर्करोगाशी लढत होते. गेले काही दिवस टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे रवींद्र बेर्डे (ravindra berde)यांचे सख्खे बंधू आणि नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू. खुद्द रवींद्र बेर्डे यांची अभिनयाशी नाळ जोडली गेली ते नभोवाणीमुळे. अगदी तरुण वयात ते नभोवाणीशी जोडले गेले. १९६५ पासून आकाशवाणीवर नभोनाटयांचे दिग्दर्शन करता करता त्यांचा नाट्यसृष्टीशी संबंध आला. १९८७ साली त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आजवर ३१ नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व आणि काहीसा विनोदी स्वभाव यामुळे सुरुवातीला खलनायकी आणि नंतर विनोदी व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. मालिका, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केले होते. ‘होऊन जाउ दे’, ‘हमाल दे धमाल’, ‘थरथराट’, ‘चंगु मंगु’, ‘उचला रे उचला’, ‘बकाल’, ‘ धडाकेबाज’, ‘गंमत जंमत ‘, ‘ झपाटलेला’, ‘भुताची शाळा’ अशा कित्येक मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले होते.