सिनेनामा 

वाढत्या वयातील बदलत्या जगाला ‘सुवर्ण मयूर’

'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' सर्वोत्कृष्ट सिनेमा

पणजी (विशेष प्रतिनिधी) :
गेले आठ दिवस मांडवी तीरावर सुरु असलेल्या ५३ व्या इफ्फीचा आज शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये समारोप झाला. यावेळी ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या स्पॅनिश चित्रपटाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सूवर्ण मयुर पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटातून सिने जगताच्या वर्तमान आणि भविष्याचे प्रतिबिंब पडद्यावर उमटलेलं दिसते, असे मत परीक्षकांनी यावेळी व्यक्त केले.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सुवर्ण मयूर, ४० लाख रुपये, मानपत्र सिनेमाच्या छायाचित्रकाराला प्रदान करण्यात आले.
‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ मध्ये दिग्दर्शकानं इव्हा या 13 वर्षांच्या मुलीच्या प्रौढावस्थेत जाण्याचा प्रवास मांडला आहे. पडद्यावर मांडलेला हा प्रवास म्हणजे निव्वळ वय वाढण्याची प्रक्रिया नाही, तर तो बदलांच्यादृष्टीनं अत्यंत तपशीलवार मांडला असल्यानं, चित्रपटातली अनेक दृश्य पाहतांना प्रेक्षकांच्या मनालाही चटका लावून जातात असंही परीक्षकांनी म्हटलं आहे. या चित्रपटातून मानवी जीवनातली गुंतागुंत अत्यंत प्रामाणिकपणे साकारली असून, हिंसा आणि चैतन्य, भिती आणि जवळीक या भावना एकसमान वाटू लागतात, या सिनेमातून मानवी जीवनाचे पैलू इतक्या तरलतेनं मांडले आहेत, की त्यामुळे हा सिनेमा पाहताना आम्हाला स्वतःलाही अनेकदा कंप फुटल्याचा अनुभव आल्याचंही परीक्षकांनी म्हटलं आहे.
यावेळी ‘नो एंड’ या चित्रपटातील  मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आले. भावनांच्या गुंतागुंतीतून यातनांच्या गर्तेत सापडलेल्या नायकाचं पात्र जिवंत केल्याबद्दल वाहिदला हा सन्मान देण्यात आला. तर ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो या १९ वर्षाच्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच चित्रपटातील भूमिकेसाठी डॅनिएलाला लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

भारतातील सिनेमावेडाची गोष्ट आपल्या हलक्या फुलक्या पद्धतीने सांगणाऱ्या प्रवीण कांड्रेगुला यांना ‘’सिनेमाबंडी‘ या तेलुगु  चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ‘नर्गिसी’ या डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीच्या संघर्षावरील इराणी चित्रपटाने आयसीएफटी -युनेस्कोचा गांधी पदक पुरस्कारावर आपले नाव कोरले.

The-Kashmir-Files
परीक्षकांनी केला ‘काश्मीर फाईल्स’चा निषेध 
स्पर्धा विभागाचे जुरी प्रमुख नदाव लापिड यांची ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची स्पर्धेतील प्रदर्शनासाठी   निवड झाल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांच्या समोर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, असल्या प्रचारी आणि विखारी चित्रपटाला स्पर्धा विभागात नाही तर महोत्सवात देखील स्थान असू शकत नाही, अशी थेट टिका करत नदाव यांनी आपला कणा ताठ असल्याचे दाखवून दिले. ते पुढे म्हणाले कि, स्पर्धा विभागात एकूण १५ चित्रपट होते त्यापैकी काश्मीर फाईल्स वगळता इतर १४ दर्जेदार होते.
‘नो एन्ड’चे नादेर साईवार ठरले  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
इराणमधल्या प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं जादुई आणि मार्मिक चित्रण असलेल्या ‘नो एंड’ या चित्रपटासाठी इराणचे प्रख्यात लेखक दिग्दर्शक  इराणी लेखक आणि दिग्दर्शक नादेर साईवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘नो एंड’  हा तुर्कीश सिनेमा असून यात इराणच्या गुप्त पोलिसांकडून केली जाणारी हेराफेरी आणि कारस्थानांचं दिग्दर्शक नादेर सैवर यांनी प्रभावी चित्रण केलं आहे. नादेर यांनी या चित्रपटातून अयाज या शांत संयमी आणि प्रामाणिक व्यक्तीची कथा मांडली आहे.
cheeranjivi IFFI
चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान
प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. काही सन्मान माझ्यासाठी विशेष मौल्यवान आहेत, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल इफ्फी आणि भारत सरकारचे आभार मानतो असे चिरंजीवी  यांनी सांगितले. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असं होतं, चित्रपट सृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. आणि आता माझी कीर्ती, माझे नाव, करिश्मा, सर्व माझ्या चाहत्यांचे अनमोल प्रेम आणि आपुलकी हे सगळं मला तुमच्याकडून मिळालं. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणार्‍या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणार्‍या चित्रपटसृष्टीचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे  चिरंजीवी यांनी सांगितले.
“प्रादेशिक चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचले आहेत.  चित्रपटांमध्ये सशक्त आशय असेल तर, ते सहजपणे सर्वदूर पोहचतात आणि त्यांचं भरपूर कौतुकही होते. या चित्रपट महोत्सवात विविध भाषांमधले उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्यात आले. त्यामुळे या विविधांगी कलेच्या क्षेत्रातल्या प्रतिभाशाली व्यक्तींच्या कलेचा अविष्कार आपल्याला अनुभवता आला. भारत आज तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे, या  उच्च तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय चित्रपटांना जगभरात पोहचवण्यासाठी पुढेही प्रयत्न केले जातील.
– अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री. 
लव्ह डिज यांना विशेष ज्युरी पुरस्कार 
यावेळी फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’साठी विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘दोनो बाद में बात करेंगे’
यावेळी चिरंजीवी यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर, ‘सिनेमातून १० वर्षाचा ब्रेक घेत राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकारणातून सिनेमाकडे वळला. तर आता पुन्हा एकदा सिनेमातून राजकारणाकडॆ वळण्याची काही शक्यता आहे का?’ असे अनुराग ठाकूर यांनी संधी साधत चिरंजीवी याना प्रश्न विचारला. प्रजा राज्यम पार्टी हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणाऱ्या आणि काँग्रेसकडून केंद्रीय मंत्रिपद उपभोगणाऱ्या चिरंजीवी यांनी ‘या विषयावर आपण दोघेच नंतर बोलूया’ असे मिश्कीलपणे सांगत मंचावरून त्यांची राजा घेतली.
‘या’ कलाकारांचा झाला विशेष सन्मान 
दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता अक्षय कुमार. राणा दुगुबाती, शर्मन जोशी, प्रसेनजित चॅटर्जी, आयुष्मान खुराणा, अभिनेत्री मानुषी चिल्लर, इशा गुप्ता आदी कलाकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा विश्वगुरू होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. मात्र
देशाचा नावलौकिक कायम टिकवायचा असेल तर इफ्फी सारखा जागतिक ख्यातीचा सिनेमहोत्सव हा यासाठी देशाचा खरा राजदूत म्हणून प्रभावी काम करू शकेल.
– डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा. 
पुरस्कार वितरण करताना झाला अनावश्यक गोंधळ 
यावर्षी परीक्षक आणि सूत्रसंचालक यांच्यात समन्वय नसल्यामुळे मंचावर एकूणच गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. परीक्षक ज्या सिनेमाची किंवा पुरस्काराची घोषणा करत होते, त्यापेक्षा वेगळ्याच सिनेमाचे दृक्श्राव्यफित चालवली जात होती. त्यामुळे मंचावर नेमके कोणत्या विजेत्याने जायचे याबद्दल गोंधळ होता. त्यात भरीस भर म्हणजे सूत्रसंचालिका एका पुरस्काराचे नाव घेण्यासाठी परीक्षकांना अप्रत्यक्षरीत्या बजावत होती तर, परीक्षक मात्र त्यांच्याकडे असलेल्या नियमानुसार आणि क्रमानुसार पुरस्कार जाहीर करत होते. त्यातही सूत्रसंचालिकेच्या अशा वागण्याबद्दल परीक्षकांनी थेट मंचावरच नाराजी व्यक्त केली. या सगळ्यामुळे महोत्सवाच्या एकूण सूत्रबद्धतेवरच प्रश्नचिन्ह तयार झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: