‘दाबोळी विमानतळ बंद करू देणार नाही’
पणजी:
भाजपने दाबोळी विमानतळ बंद करण्याचे कटकारस्थान रचले आहे असा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी सोमवारी केला.
“कतार एअरवेजने आपली दाबोळी विमानतळावरील सेवा बंद करुन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतर केली आहे. हा प्रक्रार म्हणजे दक्षिण गोवा विमानतळाचा ‘द एंड’ करण्याचा भाजपचा डाव आहे,” असे चोडणकर म्हणाले.
“मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून, भाजप सरकार दाबोळी विमानतळ बंद करण्याचे उद्दिष्ट साध्य करत आहे. यामुळे दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था नष्ट होईल. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही हा विशय उपस्थित करत होतो. आज आमच्या शंका प्रत्यक्षात येत आहेत कारण आम्ही भाजपवर विश्वास ठेवू शकत नाही,” असे चोडणकर म्हणाले.
गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नाचे साधन असलेले हे विमानतळ टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस आंदोलन कऱणार आणि लोकांना पाठिंबा देईल, असे ते म्हणाले.
“आम्हाला माहीत होतं की अशा कृत्यांतून भाजप आपला रंग दाखवेल. त्यांना सत्तेचा एवढा घमेंड आहे, की ते गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बुडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना हे ध्येय गाठू देणार नाही,” असे चोडणाकर म्हणाले.