दक्षिणेत ‘इंडिया’च्या हिंदू उमेदवारासाठी ‘त्या’ दोन आमदारांचा अट्टाहास का?
मडगाव:
लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजप उमेदवारीचे प्रबळ दावेदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी दक्षिण गोव्यातीलच विरोधी पक्षातील दोन आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यास यश मिळवीले असून, त्यामुळे भाजपसमोरही आता त्यांना उमेदवारी देण्यापासून पर्याय नसल्याचे दिसते.
विरोधी पक्षातील सदर दोन आमदार मागच्या आठवड्यात दिल्लीत होते. दक्षिण गोव्यातील एक मंत्रीही त्यावेळी दिल्लीत हजर होते व बाबूंनी सदर मंत्र्याच्या मध्यस्तीनेच दोन्ही आमदारांशी गुफ्तगू केल्याचे सुत्रांनी सांगितले. सदर दोन आमदारांचे दोन तालुक्यात वर्चस्व असून भाजपला किमान समान मते देण्यात ते मदत करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
बाबू कवळेकरांना आगामी निवडणुक सोपी जावी म्हणून दक्षिण गोव्यात हिंदू उमेदवार इंडिया आघाडीने उभा करावा असा प्रस्ताव आपल्या नेत्यांकडे सदर दोन आमदारांनी ठेवल्याचे दिल्लीतील सुत्रांकडून कळते.
विरोधी पक्षातील त्या दोन आमदारांचा आपणाला छुपा पाठिंबा असल्याचे बाबू कवळेकरांनी भाजपच्या नेत्यानांही कळविले असून, सदर दोन आमदार व भाजप श्रेष्ठी यांच्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांत बैठक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने पहिल्या यादीत दक्षिण गोव्याचा उमेदवार जाहिर केलेला नाही, असे सुत्रांकडून कळते.
दरम्यान, दक्षिण गोव्यात विरोधी पक्षाचे एकंदर पाच आमदार असून कॉंग्रेसचे दोन, आपचे दोन व गोवा फॉरवर्डचा एक आमदार आहे. कॉंग्रेस-आप युती झाली तरी “दोन” आमदारांनी घेतलेल्या या छुप्या भूमिकेने गोव्यात इंडिया आघाडीलाच तडे गेल्याचे दिसते.
दक्षिण गोव्यात ख्रिस्ती मतदारांची मते नेहमीच निर्णायक ठरली असून, ख्रिस्तीबहूल सासष्टी तालुक्यात निर्णायक आघाडी मिळत असल्यानेच यापुर्वी भाजपविरोधी खासदार जिंकल्याचे आकडेवारी सांगते.
कॉंग्रेस पक्षानेही यापुर्वी ख्रिस्ती उमेदवारच दक्षिण गोव्यात उभा केला असून, एखादा अपवाद सोडल्यास प्रत्येक वेळी ख्रिस्ती उमेदवारच जिंकला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस वेगळे धोरण आखणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.