‘राहुल गांधींनी केला भाजपच्या ‘या’ गूढ “शक्ती”चा पर्दाफाश’
मडगाव :
मध्यरात्री उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवरून अश्लील चित्रफीत प्रसारीत करण्याची गूढ शक्ती भाजपकडे आहे. देशाचे नेते राहुल गांधी भाजपच्या अशा वाईट व विकृत “शक्ती”बद्दलच बोलले, असा सणसणीत टोला काँग्रेस नेत्या आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.
भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुंबईतील भव्य सभेतील राहुल गांधी यांच्या भाषणाला लक्ष्य करून केलेल्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मिशेल रिबेलो यांनी भाजपला ‘मास्टर मॅनीप्युलेटर’ म्हटले आहे.
आमचे नेते राहुल गांधी कळंगुटचे थायलंडमध्ये रूपांतर करणाऱ्या भाजपच्या त्या ‘गूढ शक्ती’ बद्दल बोलले. गोव्याचे “क्राइम हब” मध्ये रूपांतर करणाऱ्या भाजपच्या शक्तीबद्दल त्यांनी भाष्य केले, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.
भाजपच्या “गूढ शक्ती” ने हे शांत राज्य महिलांसाठी पूर्णपणे असुरक्षित केले आहे. आज गोव्यात मुख्यमंत्र्यांनी उघडपणे “बलात्कारी” असे म्हटलेला व्यक्ती त्यांच्याच मंत्रीमडळात मंत्री आहे, असा दावा मिशेल रिबेलो यांनी केला आहे.
सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यूचा तपास करून तिच्या आई-वडिलांना न्याय देण्यात अपयशी ठरलेल्या तसेच तीन महिला आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद न देणाऱ्या भाजपच्या ‘गूढ शक्ती’वर आम्ही प्रश्न विचारणारच, असे मिशेल रिबेलो म्हणाल्या.
गोव्यातील सर्व महिलांनी या “गूढ शक्तीच्या” सर्वात भ्रष्ट, असंवेदनशील आणि बेजबाबदार भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन मिशेल रिबेलो यांनी केले आहे.