सातारा- जावली शिवेंद्रसिंहराजेमय;
वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
सातारा (महेश पवार) :
सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. दि. २८ ते दि. ३० मार्च असे सलग तीन दिवस मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले आणि संपूर्ण मतदारसंघ शिवेंद्रसिंहराजेमय झाला.
शनिवार दि. ३० रोजी सायंकाळी आ. शिवेंद्रसिंहराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर जनसैलाब उसळला. सातारा आणि जावली तालुक्यातील जनतेसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सदिच्छा कायम पाठीशी राहू द्या. केव्हाही हाक द्या, तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जनतेला दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती. सकाळी केसरकर पेठ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात बँक कर्मचाऱ्यांच्यावतीने चांदीची तलवार भेट देवून वाढदिवस साजरा करण्यात आला. वळसे ता. सातारा येथे बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५. वा. मेढा येथील वसंतगडावर समस्त जावलीतील जनतेच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजेंचा नागरी सत्कार करण्यात आला.
त्यांनतर रात्री ढोणे कॉलनी येथे महिलांसाठीचा लकी ड्रा, विलासपूर येथे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. रात्री शाहू स्टेडियम येथे क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना, रात्री १२ नंतर पोवई नाका, शाहू चौक, तालीम संघ चौक, कमानी हौद, गोल बाग चौक आदी ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सोबत शाहुनगरीतील रस्त्यांवर तरुणाई ओसंडून वाहत होती. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाईने अवघे शहर उजळून निघाले.
शनिवारी वाढदिवसाच्या दिनी सकाळपासूनच सुरुचीवर जनसागर उसाला होता. सकाळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चिमणपुरा पेठ येथील गारेचा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. भाऊसाहेब महाराज यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले तसेच भवानी मातेचे दर्शन घेतले. स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर, माउली ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिर, वळसे येथील एहसास मतिमंद मुलांच्या वसतिगृहात मिष्ठान्न वाटप आणि एअर कुलर भेट देण्यात आला.
गोडोली येथे आयोजित रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिराचे उदघाटन तसेच पोगरवाडी ता. सातारा येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन आदी कार्यक्रम उत्साहात झाले. याशिवाय मातोश्री वृद्धाश्रम खावली, आशाभवन (सकाळी व संध्याकाळी), आंनदाश्रम, रिमांड होम, बेगर्स होम, लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतिगृह, कब्रस्थान मदरसा, स्नेह निकेतन मतिमंद मुलींचे बालगृह, दारुल उलूम हुसेनीया मोळाचा ओढा, शाहू बोर्डिंग धनिणीची बाग, आर्यांग्ल हॉस्पिटल मधील रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना (सकाळ आणि संध्याकाळ) आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
सायंकाळी ६ पासूनच कोटेश्वर मैदानाजवळील कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आ. शिवेंद्रसिंहराजे याना शुभेच्छा देण्यासाठी हळूहळू गर्दी जमू लागली. काही वेळाने आ. शिवेंद्रसिंहराजे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि जोरदार फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यक्रमस्थळी भव्यदिव्य स्टेजवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. काही वेळाने सातारा शहर आणि उपनगरातील नागरिकांचे जथ्थे कार्यक्रमस्थळी दाखल होऊ लागले. दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते आणि शिवेंद्रसिंहराजेप्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंचा जयजयकार करत कार्यकर्ते आणि नागरिक आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देत होते. सायंकाळी आठच्या सुमारास मैदान खचाखच भरून गेले. माता, भगिनी, अबालवृद्धांसह अवघा जनसागर आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता.
आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. एका बाजूने स्टेजवर जाऊन आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देऊन लोक स्टेजच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरत होते. रात्री उशिरापर्यंत आ. शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री, राज्यातील अनेक आमदार, खासदार विविध पक्षाच्या नेते मंडळींनी आ. शिवेंद्रसिंहराजेंना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
…