‘पोर्तुगीजांच्या विरोधात पहिली क्रांती करणारे कुंकोळकार करतील हुकूमशाही भाजपचा पराभव’
मडगाव :
हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीविरुद्ध पहिली क्रांती कुंकळ्ळीकरांनी केली. गोव्याची अस्मिता टिकवून ठेवणारी ज्योत कुंकळ्ळीच्या सुपुत्राने प्रज्वलित केली. कुंकोळकरांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नामांकीत इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना विजयी करुन हुकूमशाही भाजपचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे, अशी गर्जना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीत केली. कुंकळ्ळी येथे काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा, इंडियाचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, दक्षिण गोवा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा, गट अध्यक्ष आसिस नोरोन्हा, कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस, नगरसेवक, पंचायत सदस्य मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.
चिफटेन स्मारकाला पुष्पांजली अर्पण करताना मला खरोखरच धन्य वाटले. या ऐतिहासिक स्थळाची देखभाल करणे गरजेचे आहे. मी जेव्हा खासदार म्हणून निवडून येईन तेव्हा कुंकळ्ळी माझ्या सर्वोच्च प्राधान्यावर राहील याची मी खात्री देतो. एकता ही कुंकळ्ळीवासीयांचे भूषण आहे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारच्या फुटीरतावादी राजकारणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की भाजपचा अविभाज्य भाग असलेल्या आरजीचा खरा चेहरा गोमतकीयांना कळला आहे.
या बैठकीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने सकारात्मक लाट दर्शवते. मला खात्री आहे की कुंकळ्ळी कॅप्टनला विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून देईल, असे केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा म्हणाले.
तत्पूर्वी, कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि सर्व काँग्रेस नेत्यांनी चीफटेन्स मेमोरियलवर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. इंडिया उमेदवारांचे पारंपरिक ब्रास बँडसह स्वागत करण्यात आले आणि महिलांनी आरती केली आणि सर्व नेत्यांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.