पणजी :
चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने आज मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतरांविरोधात तक्रार दाखल करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि इतर कार्यकर्त्यांनी आल्तीनो पणजी येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तीन पानी लेखी तक्रार सादर केली.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, दक्षिण गोवा काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे कारगिल युद्धादरम्यान सेवा देणारे युद्धवीर आहेत. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावून त्यांनी भारताच्या राज्यघटनेचा अनादर केल्याची चुकीची माहिती भाजप नेत्यांनी पसरविल्याचे त्यांनी तक्रारीत पुढे नमूद केले आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चुकीची माहिती पसरविण्यास जबाबदार आहेत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील त्यांच्या भाषणात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या भाषणाच्या संदर्भात दुर्भावनापूर्णपणे असा अंदाज लावला की जेणेकरुन आमच्या उमेदवाराचे भाषण भारतीय राज्यघटनेचा अनादर करणारे आहे असा भारतीयांचा समज व्हावा असे अमित पाटकर यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर आणि भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांच्यावर कारवाईची मागणी करतो, असे अमित पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.