‘कुशल पर्यटक मार्गदर्शक’ योजना राबवू : रोहन खंवटे
मडगाव, बेकायदेशीर दलालांच्या विरोधात ठाम भूमिका मांडत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्याचा प्रभावीपणे प्रचार करण्याच्या उद्देशाने कुशल पर्यटक मार्गदर्शक तयार करण्याकरिता किमान आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली.
ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी केळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात जॅक सुखिजा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पदभार स्वीकारला.
टुरिझम २.० ची संकल्पना अधोरेखित करताना खंवटे यांनी गोव्यातील पर्यटन वाढविण्यासाठी उदयोन्मुख आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. ट्रॅव्हल व टुरिझम संघटनेकडून ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्यास सरकार प्राधान्य देणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार पर्यटक मार्गदर्शक बनण्यासाठी १२वी इयत्तेची पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. आम्ही यावर पुनर्विचार करत आहोत. आम्ही आठवी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्यांना परदेशी भाषेत खास करून इंग्रजीतून प्रशिक्षण दिले जाऊ शकते. त्यांना गोव्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव करून दिली, तर हे मार्गदर्शक गोव्याचे सर्वोत्तम ब्रँँड ॲम्बेसिडर होऊ शकतात, आम्ही निवडणूक आचारसंहिता उठविल्यानंतर हा कार्यक्रम सुरू करू, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.