‘सरकारने गोवा क्रांती दिन लोहिया मैदानावर साजरा करावा’
पणजी :
आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 18 जून 2023 रोजी ऑक्टोबर 2023 पर्यंत स्वातंत्र्य सैनिकांची सर्व मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याबाबत दिलेली स्वतःची वचनबद्धता न पाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
गोवा सरकारने ऐतिहासिक लोहिया मैदान, पणजीचे आझाद मैदान, असोळणा आणि पत्रादेवी येथिल हुतात्मा स्मारक आणि गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलनाशी संबंधित इतर स्मारकांना “ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे” म्हणून अधिसूचित करावी अशी सातत्याने मागणी मी मागील सहा अधिवेशनात करीत आहे. परंतू, सरकार त्यावर कार्यवाही करण्यात अपयशी ठरले आहे. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात सरकारने विधेयक आणावे आणि सर्व ठिकाणे ऐतिहासीक महत्वाची स्थळे म्हणून अधिसूचित करावीत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
पर्यावरणाचा ऱ्हास, भू-रुपांतर, वाढता वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढच्या पिढीला निर्माण होणाऱ्या धोक्यांचा इशारा दिल्याबद्दल गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांना मी सलाम करतो. स्वातंत्र्यसैनिकांनी पुन्हा एकदा सरकारला आरसा दाखवला आहे, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हुकूमशाही पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आदरांजली वाहिली. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान योगदानाचे स्मरण करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.