‘अमेझिंग व्हिएतनाम’मधून होईल व्हिएतनामची विहंगम ओळख’
सध्या राज्यातून परदेशवारी, त्यातही व्हिएतनाम सारख्या आशियाई देशाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. या पर्यटकांना त्या देशाची विहंगम ओळख करून देणारे आटोपशीर पुस्तक म्हणून ‘अमेझिंग व्हिएतनाम’ मान्यता मिळवेल असा विश्वास प्रसिद्ध आयटी उद्योजक नितीन कुंकळेकर यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ प्रत्रकार आणि लेखक वामन प्रभू यांच्या सहित प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘अमेझिंग व्हिएतनाम’ या मराठी आणि इंग्रजी जोडपुस्तकाचे प्रकाशन क्लब गास्पार डायस सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर त्यांच्यासमवेत वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, गोवा वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक लक्ष्मण पित्रे, गोवा राज्य पुनर्वसन मंडळाचे माजी अध्यक्ष केशव प्रभू आणि लेखक वामन प्रभू यांची उपस्थिती होती.
देशाटन करताना सगळ्यात मोठी अडचण भाषेची होते. आणि त्यामुळे स्थानिक संस्कृती समजून घेण्यास मर्यादा येते. पण जर वामन प्रभू यांच्यासारखे पत्रकार-लेखक असतील तर ते त्या त्या देशाची संस्कृती- समाज समजून घेऊन आपल्या भाषेत त्याचा परिचय वाचकांना तसेच भावी पर्यटकांना करून देतात. अमेझिंग व्हिएतनाम हे एकाचवेळी इंग्रजी आणि मराठी भाषेतील जोडपुस्तक याचेच एक उत्तम उदाहरण आहे, असे यावेळी लक्ष्मण पित्रे यांनी नमूद केले.
यावेळी कृष्णा साळकर, केशव प्रभू यांनी देखील आपल्या भाषणांत पुस्तकाचे महत्व अधोरेखित केले. वामन प्रभू यांनी उपस्थितांचे आभार मानले.