मये व परिसराच्या पर्यटनात्मक विकासासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी
पणजी, दि ३१ (प्रतिनिधी) :
आंतरग्राम पर्यटनाचा विकास करताना पर्यटन क्षेत्राच्या संतुलित विकासावर सरकारचा अधिक भर असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज गोवा विधानसभेत दिली.
डेस्टिनेशन चलेंज मोड खाली मये व सभोवतालच्या परिसराच्या पर्यटनात्मक विकासासाठी १० कोटी रूपये मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी प्रश्नोत्तर तासाला विचारलेल्या आंतरग्राम पर्यटन विषयावरील तारांकित प्रश्नावर खंवटे सभागृहात उत्तर देत होते. राज्यात गेल्या वर्षी सुमारे ८२ लाख देशी तर साडे चार लाखावर विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. त्यातील किती पर्यटकांनी आंतरग्राम पर्यटनाला पसंती दिली याची आकडेवारी देण्याची मागणी डॉ. शेट्ये यांनी केली होती. आंतरग्राम पर्यटन धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व दावेधारकांना विश्वासात घेऊन ते तयार केले जाईल असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले.
खंवटे म्हणाले की, ही आकडेवारी खात्याकडे उपलब्ध नाही, कारण गोव्यात आलेला पर्यटक कुठे जातो, त्यावर पर्यटन खात्याचे तसे प्रत्यक्ष नियंत्रण नसते. त्यामुळे ही आकडेवारी सादर करणे अशक्य आहे. काणकोण, सांगे, सावर्डे, सत्तरी, डिचोली हे तालुके असे आहेत की, त्यात ग्रामीण भागांचा समावेश आहे. त्यामुळे आंतरग्राम पर्यटनाच्या विकास आणि वृध्दीसाठी या तालुक्यांतील वेगवेगळ्या ठिकाणांचा विचार करण्यात येत असल्याचे पर्यटनमंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.
डिचोली तालुक्यात मारूती मंदिर, राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शिवलिंग, पांडवकालीन गुहा, आमठाणे धरण, सुप्रसिध्द गडे उत्सव यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या गोष्टी पर्यटन खात्याने विचारात घ्याव्यात अशी मागणी डॉ. शेट्ये यांनी केली.
ग्रामीण भागातील पर्यटनाचा विस्ताराकरिता गोवा सरकार केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांच्या आधारे आवश्यक सुविधा निर्माणासाठी कार्यरत असल्याचेही खंवटे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते आमदार युरी आलेमाव यांनी पर्यटनाचा विस्तार करताना आंतरग्राम पर्यटनासाठीची निवडक ठिकाणे अधिसूचित केली आहेत का, असा प्रश्न केला असता तूर्तास आवश्यक सुविधा निर्माणावर आम्ही भर दिल्याचे खंवटे यांनी सांगितले.