ज्येष्ठ आणि दिव्यांगाना सन्मान द्या : प्रभव नायक
मडगाव :
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कार्यक्रम १३ डिसेंबर २०२४ रोजी मानव अधिकार आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, जेथे दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तींसाठी प्रवेश सुलभता नाही. मी कार्यक्रमाच्या जागेचे स्थलांतर करण्याच्या गोवा दिव्यांग हक्क संघटणेच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देतो आणि समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना त्वरित दखल घेण्याचे आवाहन करतो. सरकारने कारवाई न केल्यास मडगावचो आवाज दिव्यांग अधिकार संघटनेच्या आंदोलनात सहभागी होणार असा इशारा युवा नेते – प्रभव नायक यांनी दिला आहे.
दिव्यांग हक्क संघटना, गोवा आणि दिव्यांगासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कामत, राज वैद्य आणि इतरांनी केलेल्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवत, प्रभव नायक यांनी सरकारला दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशील राहण्याचे आवाहन केले.
मानवी हक्क आयोगाचे कार्यालय दिव्यांग आणि वृद्धांसाठी प्रवेश सुलभ नाही ही एक विडंबना आहे. सदर बाब दिव्यांग व्यक्तींचा हक्क कायदा २०१६ च्या कलम ३ आणि ४० चे उल्लंघन आहे. मानव अधिकार आयोग आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन साजरा करण्याच्या त्यांच्या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे हे खरोखरच दु्र्देवी आहे, असे प्रभव नायक म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे स्थळ न बदलल्यास दिव्यांग हक्क संघटना मानव अधिकार आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करेल, असे संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा यांनी जाहिर केले आहे. त्यांच्या या रास्त मागणीला माझा पाठिंबा आहे आणि मडगावचो आवाज सदर आंदोलनात सहभागी होईल, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
मला आशा आहे की समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यात हस्तक्षेप करतील आणि दिव्यांग व ज्येष्ठांसाठी प्रवेश सुलभ स्थळात सदर कार्यक्रम आयोजिव करण्यासाठी व्यवस्था करतील, असे प्रभव नायक म्हणाले.