‘आसगाव ‘ती’ घटना म्हणजे गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा’
पणजी :
डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बंगला बुलडोझर घालून जमिनदोस्त करेल अशी गोमंतकीयांची अपेक्षा होती, दुर्दैवाने, भाजपचा आश्रय असलेल्या रिअल इस्टेट माफियांना गोवा पोलिसांनी घरातील दोन रहिवाशांचे अपहरण करून गोव्यातील निवासी घर जमिनदोस्त करण्याची परवानगी दिली आहे. आता तरी मुख्यमंत्री कारवाई करतील का?, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
आपल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकणाऱ्या गोमंतकीयांसाठी ही धोक्याची घंटा आहे. या घटनांमधून धडा न घेतल्यास गोव्याबाहेरील रिअल इस्टेट आणि भूमाफियांनी गोव्याचा एक-एक इंच बळकावणे फार दूर नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.
भाजप सरकारने गेल्या बारा वर्षात गोव्यात जमीन आणि रिअल इस्टेट माफियांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना संरक्षण दिले हे स्पष्ट आहे. गोव्याच्या विक्रीतून आपली तिजोरी भरण्यावर भाजप नेतृत्वाचा भर आहे. भाजपला त्यांचा अजेंडा चालू ठेवू दिल्यास गोव्याची संपूर्ण ओळख नष्ट होईल, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
आसगाव येथील रहिवासी घराची मोडतोड रोखण्यासाठी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करण्याऐवजी विलंब करण्याचे धोरण अवलंबल्याचे जाणून मला धक्का बसला. सदर घर पाडण्याचे काम सुलभ करण्यासाठी घरातील दोन पुरुष सदस्यांचे अपहरण करण्यात आले हे गंभीर आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
या अमानुष कृत्याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
मी सर्व गोमंतकीयांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा गोव्याच्या रक्षणासाठी हातभार लावावा. आपण आपसात भांडून आपल्या जमिनी बळकावण्याची संधी बाहेरच्या लोकांना देऊ नये. आम्ही पुढच्या पिढ्यांना उत्तरदायी आहोत आणि गोवा वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.