‘स्मार्ट सिटी कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कन्सल्टन्सीची’
पणजी:
गोव्याची राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांसाठी नेमलेल्या कन्सल्टंटला ८ कोटी रूपये दिले आहेत. आता या कामाच्या दर्जावर लक्ष, देखरेख ठेवण्याची जबाबदारी कन्सल्टन्सीची आहे, असे स्पष्ट मत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले.
मंत्री मोन्सेरात म्हणाले की, एका कन्सल्टंटला 8 कोटी रूपये दिले. कन्सल्टन्सीद्वारे या कामांवर निरीक्षण केले जात आहे. कन्सल्टन्सी नेमल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे लक्ष देत नाही. ते कन्सल्टन्सीकडे बोट दाखवतात. कन्सल्टन्सी आहे म्हणून सांगितले जाते.
मी कन्सल्टन्सीला दोष देत नाही. जमिनीखाली नेमकी काय परिस्थिती आहे, हे त्या कन्सल्टंटला तरी कळाले पाहिजे. जमिनीखाली काय आहे, कुणाला माहिती आहे? कन्सल्टन्सी अपयशी ठरली आहे, असे मी म्हणत नाही.
मोन्सेरात म्हणाले की, सरस्वती मंदिर येथील काम चांगल्या दर्जाचे झालेले नाही, असे मला वाटते. माझे म्हणणे खोटे ठरावे, अशी आशा मी बाळगतो. पण, जेव्हा कोट्यवधी रूपये कन्सल्टंटला दिले जातात, तेव्हा कामाच्या दर्जावर लक्ष ठेवणे ही कन्सल्टंटची जबाबदारी आहे.
मला कुणावर टीका करायची नाही. मी काही बोललो आणि त्यांनी काम बंद केले, तर त्याचे खापर माझ्यावर फोडायला लोक मोकळे होतील, त्यामुळे वेट अँड वॉच अशीच माझी भूमिका आहे.
या कामाला मी ‘स्मार्ट मेस्स’ म्हणणार नाही, मॉन्सूनला सुरवात झाल्यावर सर्व काही समोर येईल.
दरम्यान, मंगळवारी रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली होती. त्या विषयी विचारले असता, मोन्सेरात म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले आहे ते चांगले आहे.
पण स्मार्ट सिटीच्या कामात काही वाईट असेल तर मुख्यमंत्री त्याला जबाबदार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.