मिकी पाशेको यांचा राष्ट्रवादीला रामराम
मडगाव:
2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत आलेले बाणावली व नुवेचे माजी आमदार मिकी पशेको यानी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.
गोव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाना भवितव्य नाही. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार परत एकदा भाजपात जाऊ पाहत आहेत. राष्ट्रवादी पक्ष गोव्यात मुळच धरू शकत नाही. यामुळे या दोन्ही पक्षाशी संबंध ठेवणे म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखे आहे. त्यासाठी या दोन्ही पक्षाशी अंतर ठेवून सासष्टीच्या राजकारणात सक्रिय व्हायची आपली इच्छा आहे असे ते म्हणाले.
पाशेको यांनी आपली दुसरी निवडणूक राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारीवर लढवून बाणावली येथून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी या पक्षाला रामराम ठोकून गोवा विकास पार्टीच्या उमेदवारीवर नुवेतून विजय मिळविला होता. 2017 ची निवडणूक हरल्यानंतर 2022 ची निवडणूक बाणावली येथून काँग्रेस उमेदवारीवर लढविण्याच्या आशेवर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता.
ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून 2022 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याबरोबरच ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते.