google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

शेतकर्‍यांना पाठबळ देण्यासाठी सीईओ डोंगरकुशीत

भुईंज (महेश पवार) :

चंदनवंदन गडाच्या पायथ्याला रस्त्यापासून आत डोंगरकुशीत असणार्‍या लगडवाडी, ता. वाई गावाच्या शिवारात स्वत: पायी चालत जावून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी बांबु शेती लागवडीचा शुभारंभ केला. त्यांच्या या दुर्मिळ कृतीने बांबु शेतीसाठी उद्युक्‍त झालेल्या शेतकर्‍यांना पाठबळ तर मिळालेच शिवाय त्यांनी बांबु शेतीचे महत्व आपल्या अभ्यासू व ओघवत्या भाषेत सांगितल्याने अनेक शेतकर्‍यांनी बांबु लागवडीचा निर्धार केला.

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी वाई तालुक्याचे शेवटचे टोक असणार्‍या गावात येणार म्हणून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये उत्सुकतेचे वातावरण होते. खिलारी यांनी रस्त्यापासून आतमध्ये असणार्‍या शेतात चालत जावून शरद मोरे यांच्या शेतात बांबु लागवडीचा शुभारंभ तर केलाच शिवाय ग्रामस्थांशी बांबु शेतीसह विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांची मने जिंकली. यावेळी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक नारायण घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्ञानेश्‍वर खिलारे म्हणाले, भविष्यात बांबुशेती फायद्याची ठरणार तर आहेच याशिवाय या शेतीद्वारे पर्यावरणाला हातभार लावण्याची संधी शेतकर्‍यांना मिळणार आहे. बांबु शेतीच्या वाढीसाठी शासन जास्तीत जास्त सहकार्य करत असून त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा. जैविक समृद्धतेसाठी बांबुचे महत्व मोठे असून बांबुची आवश्यक ती रोपे उपलब्ध करुन दिली जातील. लवकरच बांबु शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून शेतकर्‍यांना त्याचाही मोठा लाभ मिळणार असल्याचे खिलारी यांनी सांगून शेतकर्‍यांनी बांबु लागवड करण्याचे आवाहन केले.

वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी, शेतकर्‍यांना बांबु लागवडीसाठी तज्ञांकडून व प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, सहकार्य करण्याची ग्वाही देत या महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ वाई तालुक्यातून होत असल्याचा आनंद व्यक्‍त केला.

यावेळी सहायक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार,
सरपंच सिमा शेलार, उपसरपंच मनिषा जगताप, पं. स. चे कृषि अधिकारी शांताराम गोळे, विस्तार अधिकारी रुपेश मोरे, अशोक भालेराव, पूनम चौधरी, साईनाथ वाळेकर, सा. बां. विभागाचे उपअभीयंता संजय जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप यादव, शाखा अभियंता कोकरे, सुनिल शेलार, वसंत शेलार, अशोक मतकर, मोहन गोळे, डॉ. इंगवले, रामभाऊ जाधव, कृष्णात घाडगे आदी उपस्थित होते.
ज्ञानदेव कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रुपेश मोरे यांनी आभार मानले.


शेतकर्‍याचा सत्कार.. ज्येष्ठांशी आपुलकीचा संवाद

ज्ञानेश्‍वर खिलारी यांचा सत्कार करण्यासाठी शाल, पुष्पगुच्छ आणला होता. मात्र त्यांनी, माझा कशाला सत्कार? असा प्रश्‍न करत शेतकरी शरद मोरे यांचाच शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी त्यांनी गावातील वृद्धांशी आपुलकीने संवाद साधत गावातील विविध प्रश्‍नांची चर्चा करुन अधिकार्‍यांना जागेवरच सूचना दिल्या. यापुढेही पाच एकर बांबु लागवडीचा निर्णय झाल्यावर पुन्हा गावात येईन, असा शब्द देत ग्रामस्थांची मने जिंकली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!