
आश्वासनावरून मुख्यमंत्र्यांची माघार, गोमंतकीय कलाकार पुन्हा दुय्यम : विजय सरदेसाई
पणजी : फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, गोवा विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना आश्वासन दिले होते की गोवा राज्य चित्रपट महोत्सवातील अन्यायकारक १५ टक्के गोमंतकीय विरुद्ध ८५ टक्के बिगर गोमंतकीय अशी पात्रता निकषाची अट रद्द केली जाईल. या आश्वासनामुळे गोव्याच्या सर्जनशील क्षेत्रात नवीन आशा निर्माण झाली होती. मात्र, आज मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांना ७० टक्के बिगर गोमंतकीयांचा सहभाग व गोमंतकीय कलाकारांचा उरलेल्या ३० टक्के सहभागाची पात्रता जाहिर करुन त्यांच्या स्वतःच्याच आश्वासनाचे थेट उल्लंघन करुन गोमंतकीय कलाकारांना दुय्यम ठरवणारे पाऊल टाकले आहे,” असा घणाघात विजय सरदेसाई यांनी केला आहे.
गोमंतकीय चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ आणि कलाकार यांना स्वतःच्या राज्यातच योग्य संधीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत आहे. असंतुलन दूर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्यामुळे ते अधिकच पक्के झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्थानिक प्रतिभेला गोव्याच्या सांस्कृतिक जगतात दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. गोवा राज्य चित्रपट महोत्सव–२०२५ची अधिसूचना कालबाह्य असून अनेक संदिग्ध बाबींनी भरलेली आहे. ती रद्द करून नव्याने, पारदर्शक आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी, स्पष्ट “गोमंतकीय प्रथम” धोरण असलेली अधिसूचना जाहीर करावी, अशी मागणी विजय सरदेसाईंनी केली.
गोवा फिल्म फ्रॅटर्निटीने ही दोषपूर्ण अधिसूचना आणि नियमांतील संदिग्धता २०२५ च्या जून महिन्यातच, राज्य चित्रपट महोत्सवाची घोषणा होताच, निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी गोवा मनोरंजन संस्थेला निवेदनही सादर केले होते आणि माझ्या पुढाकाराने ईएसजीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो यांची भेट घेऊन सुधारात्मक पावले उचलण्याची हमी मिळवली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचे आजचे विधान हे केवळ विधानसभेतील आश्वासनालाच नव्हे तर स्थानीक चित्रपट कलाकारांना दिलेल्या हमीलाच हरताळ फासणारे आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.
“एक निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून मी सतर्क राहीन आणि गोमंतकीय सहभाग केवळ औपचारिक कोट्यापुरता मर्यादित करणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करीन. आमचे कलाकार सन्मान, स्वाभिमान आणि योग्य संधीस पात्र आहेत. गोमंतकीय कला आणि संस्कृती आपल्या राज्याचा आत्मा आहे. तिला राजकीय दिखाव्यासाठी तारण ठेवता येणार नाही. सरकारने आपले शब्द पाळून गोमंतकीय प्रतिभेला योग्य असा मंच द्यावा. मुख्यमंत्र्यांचे आजचे वक्तव्य म्हणजे केवळ आमच्या कलाकारांचेच नव्हे तर संपूर्ण गोमंतकीयांना धोका देणे आहे,” असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.