‘स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचे मोठे योगदान’
पणजी :
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या विकास, प्रगती आणि समृद्धीमध्ये मोठे योगदान दिले आहे. काँग्रेस पक्ष ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी उभी राहिलेली चळवळ आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान हे ‘शाश्वत सत्य’ असल्याचे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आझाद मैदानावर आयोजित देशभक्तीपर कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, कॉंग्रेस विधीमंडळ गट उप-नेते संकल्प आमोणकर, आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा, एल्टन डिकोस्ता, रोडॉल्फो फर्नांडिस, मायकल लोबो, राजेश फळदेसाई आणि इतर कॉंग्रेस पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री आणि इतरांसारख्या नेत्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळू शकले आणि देश वेगाने प्रगती करू शकला, असे अमित पाटकर म्हणाले.
खोटे आरोप व गैरसमज पसरवुन भाजप वा इतर पक्ष पंडित नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांची प्रतिमा मलिन करू शकणार नाहीत असे त्यांनी पुढे सांगितले.
सामाजिक व राजकीय क्षेत्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि संस्कृती, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेले अनेक धोरणात्मक निर्णय काँग्रेस सरकारांनी घेतले. भारताच्या सर्वांगिण प्रगतीमध्ये काँग्रेसची भूमिका कोणताही राजकीय पक्ष नाकारू शकत नाही, असे कार्याध्यक्ष व आमदार युरी आलेमाव यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांनी आपल्या भाषणात भारताचा महान इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा आणि त्यांच्यासमोर तथ्य आणि आकडेवारी ठेवावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीली कॅप्टन विरिएटो फर्नांडिस यांनी दिवजा सर्कलपासून सुरू झालेल्या “स्वातंत्र्य मार्च” मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक रोहिदास उर्फ दाद देसाई यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी आजाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सकाळी काँग्रेस भवन येथे अध्यक्ष अमित पाटकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र नाईक, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, सेवादल प्रमुख जयदेव आपा गावकर, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या सोहळ्यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान “७५ वर्षे भारत” या विषयावरील माहितीपट दाखवण्यात आला आणि देशभक्तीपर नृत्य सादरीकरणही करण्यात आले.