भाजप सरकार राष्ट्रीयीकृत बँका संपवणार : युरी आलेमाव
मडगाव :
ॲक्सिस बँकेतच बँक खाती उघडण्याचे निर्देश देणारे शिक्षण खात्याने शाळा आणि शिक्षण संस्थांना जारी केलेले परिपत्रक हे भाजप सरकारच्या खासगी बँकांना प्रोत्साहन देण्याच्या आणि अखेरीस राष्ट्रीयीकृत बँका संपवण्याच्या धोरणाचा थेट पुरावा आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
शाळा आणि शैक्षणिक संस्थांना केवळ ॲक्सिस बँकेत खाती उघडण्याचे निर्देश देणाऱ्या शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हे परिपत्रक ॲक्सिस बँकेशी संबंधित असलेल्या भाजप नेत्याच्या पत्नीचे मार्केटिंग लक्ष्य सुलभ करण्यासाठीच आहे, असा दावा केला.
सरकारने निवडकपणे केवळ ॲक्सिस बँक का निवडली हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले पाहिजे. इतर बँकांच्या तुलनेत सरकार आणि त्या सर्व शाळा आणि संस्थांना ॲक्सिस बँकेकडून कोणते अतिरिक्त फायदे मिळतील? असा प्रश्न युरी आलेमाव यांनी विचारला आहे.
शाळा आणि संस्थांना त्यांच्या आवडीचे बँक खाते ठेवण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? एखाद्या दिवशी खाजगी बँका दिवाळखोर झाल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी देण्याची गरज असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
सर्व बँकांमध्ये विशेषतः राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ऑनलाइन व्यवहाराची सुविधा आहे. यापैकी कोणत्याही बँकेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री गुरु दक्षिणा योजना” राबवली जाऊ शकते. भाजप नेत्याच्या पत्नीच्या निहित स्वार्थामुळेच सरकार शाळा आणि संस्थांवर ॲक्सिस बँकेत बँक खाती उघडण्यासाठी दबाव आणत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
शिक्षण संचालकांनी शासनाच्या दबावाला बळी पडून खाजगी क्षेत्रातील बँकांना प्रोत्साहन देणारी परिपत्रके जारी करू नयेत. सदर बँकांमध्ये काही फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी संचालकांवर असेल असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला असून, खाते उघडण्यासाठी बँकेची निवड करणे संबंधित शाळा आणि संस्थांवर सोडली पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.