‘म्हणून मोदी आता केवळ वॉरंटीविना गॅरंटी देत आहेत…’
पणजी :
भाजपचे मूळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह भारतातील जनतेला कळून चुकले आहे की, भारतात भाजप संपला आहे आणि आता केवळ मोदींच्या वॉरंटीवीना असलेल्या गॅरंटी देवून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
आज प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती मोदी-शाह जोडीचा हुकूमशाही कारभार स्पष्टपणे दर्शवते. मूळ भाजप कार्यकर्त्यांना हा “ट्रेलर” आहे, त्यांनी पूढे काय वाढून ठेवले आहे ते आताच लक्षात घ्यावे.
भाजपने आज जगासमोर हे स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडे नेतृत्वाची दुसरी फळी नाही. संपूर्ण संघटना मोदींनी हायजॅक केली आहे आणि म्हणूनच भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मोदींचा फोटो राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या फोटोपेक्षा मोठा आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
भाजप शब्दांच्या खेळात तरबेज आहे. त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना ‘पर्रीकर’ वगळून मोपा विमानतळाचे ‘मनोहर’ असे नामकरण करून अपमानित केले. माझी मागणी आहे की, भाजपने जनतेला स्पष्ट करावे की, हे मोदी कोण आहेत, ज्याची हमी ते देशाला देत आहेत. तो ललित मोदी किंवा नीरव मोदीही असू शकतो, असा टोला अमित पाटकर यांनी हाणला.
भाजपचा जाहीरनामा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अल्बम आहे. संपूर्ण घोषणापत्राला गॅरंटी नाही आणि वॉरंटीही नाही, असे अमित पाटकर म्हणाले.