”हे’ तर प्रशासन ढासळल्याचेच प्रतिबिंब’
पणजी :
सचिवालयाच्या मागील प्राकाराचे भंगारात झालेले रुपांतर हे भाजप सरकारचे प्रशासन कोलमडल्याचे प्रतिबिंब आहे. विधानसभा संकुलाच्या परिसरात धूळ खात पडलेल्या वाहनांमुळे अभ्यागतांना त्यांची वाहने बाहेर रस्त्यावर पार्क करून लांब अंतर चालून विधानसभा संकुलात यावे लागते, असे काँग्रेसचे समाज माध्यम प्रमुख दिव्याकुमार यांनी म्हटले आहे.
सचिवालय संकुलाच्या परिसरात धूळ खात पडलेल्या विविध वाहनांचा व्हिडिओ प्रसिद्ध करून, दिव्याकुमार यांनी भाजप सरकारचे जनतेची गैरसोय करण्याचे धोरण असल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरीत दखल घेवून ही सर्व मोडकळीस आलेली वाहने हटविण्याचे आदेश द्यावेत आणि आगामी विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित असलेल्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा तयार करावी. सरकारने गोव्यात विवीध ठिकाणी वापरात न असलेल्या परंतू पार्कींगची जागा व्यापणाऱ्या गाड्यांवरही कारवाई केली पाहिजे अशी मागणी दिव्याकुमार यांनी केली आहे.
पत्रकार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच आमदारांच्या कर्मचार्यांसह विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी येणार्या लोकांना पार्किंगच्या जागेअभावी प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो आणि त्यांची वाहने लांबवर उभी करून लांब पायी जावे लागत असल्याचे दिव्याकुमार यांनी म्हटले आहे.
विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्यांनी अंतर्गत रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांमुळे पर्वरीच्या रहिवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड इत्यादी आपत्कालीन सेवेच्या वाहनांना वारंवार ट्रॅफिक जाम झाल्याने अडथळा तयार होतो, असे दिव्याकुमार यांनी सांगितले.
मला आशा आहे की भाजप सरकारला विधानसभा प्राकारातील वाहनांवर कारवाई करण्याची सुबूद्धी येईल व धूळ खात पडलेली वाहने हटविली जातील असे दिव्याकुमार यांनी म्हटले आहे.