हिंमत असेल तर, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे आव्हान स्वीकारा… : काँग्रेस
पणजी :
उल्टा चोर कोतवाल को डांटे? भाजप देव आणि लोकांच्या जनादेशाचा विश्वासघात केलेल्या देशद्रोही आणि फुटीरतावाद्यांनी भरलेला आहे. कृपया कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे आव्हान स्वीकारा आणि खुली चर्चा करण्यास तयार व्हा. गेल्या 10 वर्षांच्या भाजपच्या राजवटीत संविधानावर घातलेला घाला, पक्षांतरे, भ्रष्टाचार, महागाई, प्रदूषण, बेरोजगारी यावर बोलूया, असे उघड आव्हान काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप नेत्यांना दिले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच काही भाजप नेत्यांनी कॉंग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या विधानाचा विपर्यास करुन टाकलेल्या सोशल मीडिया पोस्टच्या मालिकेवर काँग्रेस नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. कारगिल युद्धातील योगदानाबद्दल काँग्रेस नेत्यांनी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचेही कौतुक केले.
देशाच्या घटनेचा खून करून मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या भाजप सरकारची स्थापना झाली. देशभरात पक्षांतर करणाऱ्या भाजपला संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. गुन्हे, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भाजपने 10 वर्षात गोव्याचा केलेला विनाश यावर बोलूया, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
भाजप सरकारने प्रति किलो 175 रुपये आधारभूत किंमत न दिल्याने काजू शेतकरी हवालदील झाले आहेत. संजीवनी साखर कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. भाजपने त्यांना राजकीय आरक्षण न दिल्याने एसटी समाज वैफल्यग्रस्त झाला आहे. चला यावर चर्चा करुया!, असे केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी सांगितले.
गोवा हे ड्रग्ज डेस्टिनेशन बनल्याने गोमंतकीय भयभीत झाले आहेत. शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरण झाल्याने गोमंतकीयांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, गेल्या 10 वर्षात भाजपच्या राजवटीत सहकार क्षेत्र कोसळल्याने चिंतेंचे वातावरण आहे. या सर्व मुद्द्यांवर तसेच भाजपकडून देशाच्या संविधानाला निर्माण झालेला धोका यावर चर्चा करू, असे काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी भाजपला आव्हान दिले आहे.