‘विद्यापीठाने २५ एमटीएसच्या सेवा बंद करून केला युवकांवर अन्याय’
पणजी :
गोवा विद्यापीठाने गेल्या दहा वर्षांपासून काम करणाऱ्या 25 मल्टी टास्किंग कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द करून आणि नव्या भरतीदरम्यान त्यांना सामावून न घेतल्याने त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप बुधवारी काँग्रेसने केला.
गोवा प्रदेश काँग्रेस समिती आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी गोवा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार यांना घेराव घातला आणि या संदर्भात प्रश्न केले. काँग्रेस नेते एल्विस गोम्स म्हणाले की, गोवा विद्यापीठाने सध्याच्या २५ एमटीएसचा करार रद्द केल्याने हा गोमंतकिय तरुणांवर अन्याय आहे.
“जेव्हा या 25 एमटीएस कर्मचार्यांची प्रक्रियेचे पालन करून भरती करण्यात आली होती, तेव्हा सरकार त्यांना कामाकरुन कसे काढून टाकू शकते आणि कोणतीही चूक नसताना त्यांना बेरोजगार कसे करू शकते,”असे गोम्स यांनी प्रश्न केले.
ते म्हणाले की, नवीन भरतीसाठी परीक्षेला बसलेल्या या सर्व 25 एमटीएस उमेदवारांना हेतुपुरस्सर नापास करण्यात आले आहे, कारण सत्तेत असलेल्या राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींना नोकऱ्या देण्यात आल्या असाव्या.
“कदाचित नवीन भरतीतून पैसे कमवण्यासाठी त्यांनी हे जाणूनबुजून केले असावे,” असा आरोप त्यांनी केला.
गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की भाजप सरकार दहा वर्षांच्या सेवेनंतर त्यांचा कसा वापर करून अन्याय करत आहे, असे ते म्हणाले.
“दहा वर्षापूर्वी नियुक्ती करताना सुरुवातीला परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि आता जवळपास दहा वर्षांचा अनुभव असताना हे सर्व कसे नापास होऊ शकतात,” असा सवाल त्यांनी केला.
या कर्मचाऱ्यांना परत घेण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहणार असून, सरकारने त्यांना न्याय दिला नाही तर पुढचे पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदिप नाईक म्हणाले की, या २५ एमटीएस कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवण्यात आले असून त्यापैकी कोणीही नव्या भरतीसाठी परीक्षा उत्तीर्ण झाले नाही.
या २५ एमटीएसवर अन्याय करून नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती कशी देता येईल, असे ते म्हणाले.
अॅड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, सरकारने या २५ एमटीएसवर अन्याय केला आहे, त्यापैकी काही आता वयोमर्यादा पूर्ण करत आहेत आणि भविष्यात त्यांना सरकारी पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.
जनार्दन भंडारी, नौशाद चौधरी, चंदन मांद्रेकर, साईश आरोसकर, विवेक डिसिल्वा, हिमांशू तिवरेकर, यश कोचरेकर, मुक्तार अहमद, अनिकेत कवळेकर, प्रणव परब, तेजस दिवकर, व्यास प्रभू चोडणेकर उपस्थित होते.