‘का’ मानले काँग्रेसने गोविंद गावडेंचे आभार?
पणजी :
भाजप सरकारने अटल सेतू पुलाच्या बांधकामावर केलेला भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल काँग्रेसने बुधवारी कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचे आभार मानले आहेत.
अटल सेतू पूल आणि अन्य प्रकल्पात भ्रष्टाचार झाला असताना केवळ त्यांनाच का लक्ष्य केले जात आहे, या गावडे यांच्या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसचे मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर म्हणाले की, लोकांनी गावडे यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे.
“आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे पाहूनही अनेकजण मौन बाळगतात. पण गोविंद गावडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे की सत्ताधारी आमदार स्वतःचे सरकार कसे भ्रष्टाचार करते हे उघडकीस आणू शकतात आणि लोकशाहीला पारदर्शकपणे पुढे नेण्यास मदत करू शकतात. गोविंद गावडे यांनी भाजपची जनविरोधी कृत्ये आणि भ्रष्टाचार अशाच प्रकारे उघड करावा अशी विनंती मी त्यांना करत आहे,” असे पणजीकर म्हणाले.
पणजीकर म्हणाले की, गोविंद गावडे यांनी अटल सेतू घोटाळ्याबाबत सत्य बोलले आहे. “आम्ही वेळोवेळी सांगितले होते की अटल सेतू हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे स्मारक बनले होते. माजी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पुराव्यानिशी हा घोटाळा उघडकीस आणला होता. मात्र, भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात भाजप अपयशी ठरला होता. ” असे पणजीकर म्हणाले.
“गावडे यांचे म्हणणे बरोबर आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतच लोकांनी का बोलायचे. अनेक विभागांमध्ये असे भ्रष्टाचार झाले आहेत. या भ्रष्ट आणि असंवेदनशील सरकारचा पर्दाफाश केल्याबद्दल मी पुन्हा एकदा गावडे यांचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.