काँग्रेस करणार राज्यभर ‘म्हादई जागोर’
पणजी :
काँग्रेसने रविवारी नानोडा वाळपोई येथे म्हादई नदीचे पूजन करून तिच्या अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आशीर्वाद मागितले.
‘म्हादई जागोर’ कार्यक्रमांतर्गत राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. सोमवारी विर्डी आमोणा सांखळी येथे होणारी सभा सफल व्हावी यासाठीही आशीर्वाद घेण्यात आले.
यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेससमितीचे अध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लोस फॅरेरा, कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
अमरनाथ पणजीकरांच्या म्हणण्यानुसार नानोडा येथील म्हादई नदीतून ‘कलश’मध्ये जमा केलेले पाणी गोव्यातील सर्व भागात नेऊन लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाईल.
“म्हादई वळवण्याच्या सध्याच्या प्रकाराचा काय परिणाम होणार हे लोकांना समजले पाहिजे. हे पाणी वळवण्यात कर्नाटकला यश आले तर गोव्याचे नुकसान होईल आणि पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही. लोकांना या समस्येची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रत्येक गाव आणि शहराला भेट देऊ,” असे पणजीकर म्हणाले.
ते म्हणाले की, वादग्रस्त कळसा- भंडुरा धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने कर्नाटकचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केला असल्याने तो मागे घेण्यासाठी गोव्यातील जनतेला संघर्ष करावा लागणार आहे. आई म्हणणाऱ्या म्हादईचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “माता म्हादईचे महत्त्व आपण जाणून घेतले पाहिजे.
आमदार कार्लोस फॅरेरा यांनी म्हादईला लुटणारा आमचा शत्रू आहे असे म्हटले. “मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. आपण म्हादेईला वाचवायला हवे,” असे ते म्हणाले.
गोव्यातील जनतेने आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आणि सोमवारी सांखळीच्या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही अमित पाटकर यांनी केले. “काँग्रेस नेहमीच म्हादईच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहे. आताही आम्ही लढा देऊ आणि आमची म्हादई वाचवू,” असे पाटकर म्हणाले.
सरचिटणीस प्रदिप नाईक यांनी या कार्यक्रमाचे समन्वय केले होते.