google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…म्हणून एअरलाइन्सचे दाबोळीवरुन मोपाकडे स्थलांतर’

मडगाव :

सुविधा आणि प्रोत्साहनांच्या अभावामुळेच विमान कंपन्यांना दाबोळीवरुन मोपा येथे विमानसेवा हलवण्यास भाग पाडले जात असून भाजप सरकार जाणुनबजून गप्प आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळाचे निरंतर संचालन आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी तातडीने सर्व संबंधितांची बैठक घेणे आवश्यक आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

स्पाईसजेट एअरलाइन्सने दाबोळीहून मोपा येथे विमानसेवा हलवण्याच्या केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकारने दोळे बंद ठेवल्यास दाबोळी लवकरच घोस्ट एअरपोर्ट होईल, असा इशारा दिला आहे.

2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने क्रोनी भांडवलदारांना स्ट्रेटजीक व्यवसायांत उतरण्यासाठी प्रोत्साहन देऊन सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याचा कारभार संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मोपा विमानतळाचे कंत्राटदार जीएमआरला लाभ मिळवून देण्यासाठीच भाजप सरकार जाणूनबुजून दाबोळीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून दाबोळी आणि मोपा विमानतळांचे युजर्स डेव्हलपमेंट शुल्क संरेखित केले पाहिजे. दाबोळी विमानतळाची उत्तम देखभाल, सौंदर्यीकरण, जलद वाहतूक व्यवस्था तसेच विमानसेवा पुरविणाऱ्यांना व संबंधीत व्यावसायीकांनी विवीध परवान्यांची जलद मंजुरी देणे यासारख्या त्वरित सुधारणा करणे आवश्यक आहे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

दाबोळी विमानतळ बंद झाल्यास दक्षिण गोव्याचे फार मोठे नुकसान होईल. दाबोळी विमानतळावरील विमानसेवा दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सुरू ठेवणे महत्वाचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

कतार एअरवेजने आपली विमानसेवा मोपा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा केल्यानंतर दाबोळी विमानतळाचे कोळसा टर्मिनलमध्ये रूपांतर होण्याची भीती मी व्यक्त केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे भाजप सरकारने त्यावर जाणीवपुर्वक मौन बाळगले आहे. यावरून सरकारचा काहीतरी छुपा अजेंडा असल्याचे दिसून येते, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!