
क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन
लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली. 1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये 1983चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.
द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, अतिशय दु:ख वाटलं, द्वारकानाथ संझगिरी हे क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचं ज्ञान असलेले, क्रिकेट, क्रिकेटीयर्स, क्रिकेट रेकॉर्डर्स याचे इनसायक्लोपीडिया असलेले, क्रिकेटच्या संदर्भातील प्रसंग याचं विश्लेषण करणारे आमचे मित्र संझगिरी गेले याचं दु:ख झाले. शेवटी गाणी आणि क्रिकेट असे एकत्रित कार्यक्रम ते करत होते. क्रिकेट, क्रिकेटीयर्स, क्रिकेट संबंधी पुस्तक याच्या प्रकाशनाचे कार्यक्रम ते करत होते. आपल्या साहित्य, संस्कृती, मनोरंजन याची वेगळी धाटणी त्यांनी बांधली. ते काही काळ आजारी होते.