‘पर्यटन बोट राईड जेटीवर धोकादायक परिस्थिती’
पणजी :
पर्यटन मंत्री रोहन खंवटे ‘मिशन टोटल कमिशन’साठी इव्हेंटवर करोडो रुपये खर्च करत असले तरी पणजी येथील पर्यटन बोट राईड्स जेटीवर लहान मुलांसह पर्यटकांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
पणजी येथे मांडवी पुलाखालील जेटीवर काही पर्यटक लाइफ जॅकेट न घालता धोकादायक परिस्थितीत पर्यटन बोटीतून उतरत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून काँग्रेस अध्यक्षांनी पर्यटकांचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल पर्यटन खात्याला धारेवर धरले आहे.
पर्यटक ज्या पाँटूनवरून उतरत आहेत ते एका बारीक दोरीने बांधलेले आहे. सदर दोरी कोणत्याही क्षणी तुटू शकते. ज्या अरुंद पायऱ्यांवरून पर्यटक लहान मुलांना खांद्यावर घेऊन जेटीवर चढत आहेत, तिथे हात धरायला रेलिंग नाही, असे अमित पाटकर यांनी आपल्या व्हिडीओतून दाखवून दिले.
बोट राइड जेट्टीवर संपूर्ण गैरव्यवस्थापन आणि अनागोंदी आहे. दिवझा सर्कल येथील कोस्टल पोलीस चौकीचा कारभार धड नाही. तेथे आपतकालीन स्थितीत वापरासाठी असलेली रिजीड इन्फ्लेटेबल बोट मागील आठ महिने नादुरूस्त असल्याने टारपोलिनने झाकून ठेवली आहे. सदर बोटच नादुरूस्त असताना बचावकार्य कसे करणार? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी त्यांची मोठमोठ्या बाता मारणे थांबवावे आणि तथाकथित प्रमोशनल इव्हेंट्स आणि परदेशी जंकेट्सवर जनतेचा पैसा खर्च करणे बंद करुन त्याऐवजी गोव्यातील सुरक्षित पर्यटनावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली आहे.