
आमदार दौऱ्यांवरील भ्रामक RTI उत्तरावर विधीमंडळ सचिवालयाने खुलासा करण्याची मागणी
मडगाव :
मार्च २०२२ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कोणत्याही आमदाराने वैयक्तिक किंवा अधिकृत दौरे गोव्याबाहेर किंवा परदेशात केलेले नाहीत, असे गोवा विधीमंडळ सचिवालयाने आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. हे उत्तर धक्कादायक असून सचिवालयाच्या नोंदींच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करते, असे राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
“हे सर्वश्रुत आहे की मागील तीन वर्षांत गोव्याच्या जवळपास सर्व ४० आमदारांनी राज्याबाहेर प्रवास केले आहेत आणि अनेकांनी परदेशातही दौरे केले आहेत,” असे काकोडे म्हणाले. “वर्तमानपत्रांतील बातम्या, सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि सार्वजनिक भाषणांमधून हे वारंवार स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत सचिवालयाने असा दावा करणे की एकही दौरा झाला नाही, हे विश्वास बसणारे नाही.”
“ही विसंगती म्हणजे सचिवालयाच्या कामकाजातील गंभीर त्रुटी किंवा मुद्दामहून चुकीची माहिती दिल्याचे संकेत देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “जर इतक्या प्राथमिक आणि सहज तपासता येणाऱ्या बाबींची नोंद सचिवालय योग्य पद्धतीने ठेवत नसेल, तर मग बाकीच्या कामकाजात किती गंभीर चुका असतील याची कल्पना करता येते,” असे पै काकोडे म्हणाले.
या संदर्भात विधीमंडळ सचिवालयाने तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. “सचिवालयाला आमदारांच्या दौऱ्यांची माहिती खरोखरच नव्हती का? की माहिती असूनही ती लपवली जात आहे? अधिकृत दौरे नोंदवले गेले नसतील आणि वैयक्तिक दौरे जाहीर केले गेले नसतील, तर हा पारदर्शकतेच्या मूलभूत तत्त्वांचा भंग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विशाल पै काकोडे यांनी लक्ष वेधले की, ही काही पहिलीच घटना नाही. “फक्त काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक लेखा समितीच्या मुदतवाढीवरूनही भ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी विधीमंडळ कामकाज मंत्र्यांना सभागृहात स्पष्ट करावे लागले होते की समितीची मुदत संपलेली होती, ज्यामुळे सचिवालयाच्या कार्यप्रणालीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता,” याची आठवण रै काकोडे यांनी करून दिली.
“या घटना वारंवार होत असल्यामुळे सचिवालयाच्या कार्यक्षमतेवर आणि नोंदींच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे,” असे राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांनी म्हटले असून त्यांनी सचिवालयाच्या नोंदी आणि कार्यपद्धतीचे स्वतंत्रपणे परीक्षण व्हावे, अशी जोरदार मागणी केली आहे.