IFFI 53 मध्ये अनुभवा राखेतून भरारी मारणाऱ्यांची गोष्ट
ती राखेतून भरारी घेते, निर्भयपणे… तिच्या शरीरावर असलेला केवळ तिचा अधिकार आणि त्यात सामावलेले तिचे निर्णय जाहीररीत्या सांगण्यासाठी. होय, केरळमधील आदिवासी समाजातील मुलींच्या उत्तुंग भरारीच्या कथेद्वारे प्रेरित होण्याची संधी गमवायची नसेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.
‘धाबरी कुरुवी’ या चित्रपटाने ही चित्तवेधक कथा आपल्यासमोर आणली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिलाच चित्रपट आहे ज्यामध्ये केवळ आदिवासी समुदायातील लोकांनीच कलाकार म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियनंदन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला पूर्णपणे इरुला या आदिवासी भाषेत चित्रित करण्यात आले आहे.
गोव्यात येत्या 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणाऱ्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. आणि हो, इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात, या 104 मिनिटांच्या या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे.
चौकट मोडून साचेबद्धतेच्या पलीकडे जाण्यात अयशस्वी झाल्याबद्दल भारतीय सिनेमातील स्थानिक कलाकारांच्या चित्रणावर अनेकदा टीका करण्यात आली आहे.
आदिवासी लोकांच्या खऱ्या अस्मितेला आणि संस्कृतीला कदाचित न्याय देऊ न शकलेल्या सिनेपरंपरा आणि संस्कृतीच्या विश्वात, धाबरी कुरुवी हा चित्रपट नवीन आशा आणि प्रेरणेने उजळवून टाकण्यासाठी उभा असलेला प्रकाशस्तंभ ठरेल अशी अपेक्षा आहे. आदिवासी प्रथा आणि संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आदिवासी मुलीच्या वादळी प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. ही मुलगी रूढीविरोधात लढते आहे, समाजाने तिला ज्या रूढी परंपरांच्या साखळ्यांनी बांधले होते त्या साखळ्यांपासून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करते.आहे.
इरुला भाषेत धाबरी कुरुवी म्हणजे ‘ पिता अज्ञात असलेली चिमणी’. आदिवासी लोककलेचा भाग असलेला एक पौराणिक पक्षी, शांतपणे सहन करणाऱ्या, अन्यायाच्या बेड्या तोडण्यासाठी तळमळणाऱ्या, न पाहिलेल्या लोकांच्या न सांगितल्या गेलेल्या कहाण्या टिपतो. या चित्रपटात या लोकांच्या व्यथा आणि संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे.
तर, या चित्रपटाला अनोख्या पात्रांचा मान मिळवून देणारे कलाकार कोण आहेत? ते सुमारे साठ लोक आहेत, जे दक्षिण भारतातील केरळ राज्यातील आदिवासी वस्ती असलेल्या अट्टापाडी येथील इरुला, मुदुका, कुरुंबा आणि वडुका या आदिवासी समुदायातील आहेत. त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एकही चित्रपट पाहिला नव्हता.
अट्टपडी येथे झालेल्या अभिनय कार्यशाळेतून कलाकारांची निवड करण्यात आली या कार्यशाळेत सुमारे 150 लोक सहभागी झाले होते. चित्रपटात मीनाक्षी, श्यामिनी, अनुप्रसोभिनी आणि मुरुकी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात ज्यांना गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता त्या नानजियाम्मा या अट्टप्पाडी येथील आदिवासी महिलेचाही समावेश आहे.
धाबरी कुरुवी या चित्रपटाने केवळ आदिवासी समुदायाने अभिनय केलेला एकमेव कथा आधारित चित्रपट म्हणून युआरएफ विश्वविक्रम केला आहे. केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली आहे