डोंगऱ्यादेवाला आत्मीयतेने भिडण्याची गोष्ट…
– डॉ. सुधीर रा. देवरे
नागपूरच्या विजय प्रकाशनाकडून ‘गावदवंडी’ व ‘डोंगरदेव’ ही दोन लोकसंस्कृती विषयक पुस्तकं एवढ्यात प्रकाशित झालीत. पैकी ‘डोंगरदेव’ पुस्तकातील मनोगत…
आमच्या विरगावच्या वरच्या म्हणजे पश्चिम दिशेला कान्हेरी नदीचा उतार लागत असे, त्या उताराच्या ढेंगड्यांवर (टेकड्यांवर) भिल आदिवासी बांधवांची भिलाटी वसलेली होती. तोंड पाहण्याचा कार्यक्रम असो, कोणाचा चिरा बसवायचा असो, लग्नाचा नाच असो, होळीचा शिमगा असो की डोंगऱ्या देवाचा उत्सव असो, भिलाटीतले सर्व कार्यक्रम लहानपणी समरसून पहायचो.
मार्गशिर्ष महिण्यात डोगंऱ्या देवाचा उत्सव दर वर्षी भिलाटीत पंधरा दिवस चालायचा. तो कार्यक्रम मला खूप भयंकर वाटायचा. त्यांचे नाच, गाणी, अंगात येऊन घुमणारे देव- भक्त, वारं, त्यांचा अवतार, त्यांची शिस्त, त्यांची वाद्य, त्यांच्या आदिम आरोळ्या, हुंकार, धवळीशेवर, टापऱ्या, तोंडाने वाजायच्या पुरक्या, ठेकाने वाजवायच्या टाळ्या, या सर्वांनी जागीच हरखून जायचो. गावखळी बसवायची पध्दत, थोम गाडायची पध्दत, त्यांचे आचार, पथ्य, वेश अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे माझं ध्यान रहायचं. त्यांच्या विशिष्ट भाषेतल्या बारकाव्यांसहीत आलेले उच्चार व ह्या आचरण पध्दतीतील नवे शब्द एरव्ही व्यवहारात ऐकायला मिळायचे नाहीत. या सर्व गूढ वाटणाऱ्या गोष्टींमुळं त्यांच्याकडे केव्हा ओढला गेलो हे मलाही कळलं नाही.
लहानपणी दोन वर्षांचा असताना घरच्यांनी माझ्यातली इडापिडा निघून जाण्यासाठी पारंपरिक लोकसमजुतीनुसार मला डोंगऱ्यादेवाच्या भक्तांमध्ये गल्लीत झोपवून दिलं आणि घुमरे मला पायांनी ओलांडून पुढं निघून जात होते. हंबरडा फोडून रडत हे भयानक दृश्य बालपणी स्वत: अनुभवलं. नंतर आईनं सांगितलं की असं केल्यावर अंगातील इडापिडा निघून जाते. (लोकश्रध्देचा भाग). तेव्हापासूनच मला डोंगऱ्यादेवाच्या उत्सवाच्या भितीयुक्त दराऱ्यानं बांधून ठेवलं आहे.
डोंगऱ्यादेवाचा हा सगळा अनुभव लहानपणापासूनच मनात जोपासून ठेवला आहे. डोंगऱ्यादेवासारखाच कानबाई, भोवाडा, टिंगरीवाला, रायरंग, आढीजागरण, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, काठीकवाडी, बार, आईभवानी, आईमरी, धोंड्या धोंड्या पाणी दे अशा सर्व प्रकारच्या लोकपरंपरांमध्ये रंगून जायचो.
पुढं असं समजलं, की डोंगऱ्यादेवाचा उत्सव फक्त भिल बांधवच साजरा करत नाहीत तर बागलाणच्या पश्चिमेला असलेले कोकणा बांधवही साजरा करतात आणि भिल समाजातले लोक साजरा करतात तेव्हाच- त्याच महिण्यात आणि तसाच. मग त्या दिशेनं अभ्यासाला लागलो. सुधाकर देशमुख नावाचे कोकणी मित्र होते. त्यांच्या जवळ हा विषय काढला. तर ते म्हणाले, आमच्या गावात हा उत्सव असतो. मी तुम्हाला गावाला उत्सवाच्या वेळी घेऊन जाईल.
कोसुर्डे हे गाव कळवण तालुक्यात दुर्गम भागात आहे. गावाच्या तिन्ही बाजूनं डोंगर व दळवटकडून कोसुर्डे गावात जाण्यासाठी ओढा ओलांडून जावं लागतं. १९९५ साली या गावात मित्राबरोबर त्यांच्या बाईकनं डबलशिट गेलो. (नाला कोरडा होता म्हणून ओलांडावा लागला नाही. अलीकडे पूल झाला आहे.) गावाला वेढलेल्या डोंगरांपैकी एका डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमेला डोंगऱ्यादेवाची रानखळी साजरी होणार होती. त्या डोंगरावर संध्याकाळी डोंगऱ्यादेवाच्या उपासकांच्या आधीच तब्बेतीनं चालत जाऊन बसलो. कपड्यांना अनेक कुसळं चिकटून आत अंगाला टोचत होती. हात खडकांवरुन सरकत होते म्हणून हात खरचटले होते. आम्ही डोंगरावर जाऊन विसावत नाही तोच मागून डोंगऱ्यादेवाचे उपासक आले.
डिसेंबरच्या थंडीत रात्रभर उघड्यावर थांबलो. त्यांच्यासोबत ‘भुज्या’ नावाचा कुठलीही चव नसलेला पदार्थ आणि नागलीची भाकर हातावर घेऊन खाल्ली. शेकोटीशेजारी बसून संपूर्ण रात्र डोंगऱ्या देवाच्या उपासकांचा नाच, अंगात घेण्याची पध्दत, काकडा आणि चिमटा उघड्या अंगावर मारुन घेण्याची रीत, त्यांचे आदिम हुंकार, नाच पहात, थाळीवरची कथा ऐकत थंडीत कुडकुडत बसलो. प्रकृतीमुळं माझं शरीर थंडीनं लवकर कुडकुडतं आणि हातापायाला मुंग्या येऊन शरीर बधीर होतं. तरीही ह्या अभ्यासासाठी मी थंडीतली पूर्ण रात्र डोंगरावर घालवली. शिवार देव, वाघ देव, नाग देव, सगळ्या प्रकारची (काल्पनिक) भूतं यांची मुळातून माहिती भक्तांकडून काढत होतो. गाणी ऐकली, मंत्र ऐकले आणि भक्तांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यांचे मंत्र, काही गाणी स्वत: बैठक मारुन लिहून घेतली. नंतर जसं टेप करुन घेणं शक्य झालं ते टेप करून घेतलं. (तेव्हा मोबाईल नव्हते.)
१९९५ साली नाशिकला मुक्त विद्यापीठ आणि लोकशिबीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं कालिदास कला मंदिरात लोक शिबीर परिषदेचा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमात ‘लोकायन’ नावाची स्मरणिका प्रकाशित झाली होती. त्या स्मरणिकेसाठी माझा लेख मागितला म्हणून भिल बांधवांवरील (१९९३ ला लिहिलेला) डोंगऱ्यादेव दैवतावरील लेख ‘लोकायन’ मध्ये छापण्यासाठी दिला. तोपर्यंत डोंगऱ्यादेवावर कुठंही काहीही लिखाण झालेलं नव्हतं. डोंगऱ्यादेवावरचं हे माझं पहिलं लिखाण होतं. हाच लेख लोकायनसह युनिक फिचर्स तर्फे तेव्हाच्या दैनिक गावकरीतही त्यांनी परस्पर छापला होता. गावकरीत हा लेख आल्यामुळं डोंगऱ्यादेव हा उत्सव लिहिण्याचाही विषय होऊ शकतो हे नवीनच इकडच्या सर्वसामान्य वाचकांना गावागावात समजलं. (हा उत्सव फक्त उत्तर महाराष्ट्रारात- अहिराणी, कोकणा, डांगी भाषा पट्ट्यात साजरा होतो. इतरत्र नाही.) याच विषयावरील माझा दुसरा लेख पुण्याच्या ‘आदिवासी संशोधन पत्रिकेत’ प्रकाशित झाला. (हे सर्व लेख मी संपादित करीत असलेल्या अहिराणी ‘ढोल’ अंकातही अहिराणी भाषेत आलेले आहेत आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या ‘अहिराणी लोकपरंपरा’ या ग्रंथात त्यांचे मराठी भाषांतर अतिशय त्रोटक व थोडक्यात समाविष्ट केलं आहे. मात्र सदर पुस्तकात बऱ्याच परिष्करणांसह हे लेख सखोल- सविस्तरपणे अहिराणी भाषेत आणि मराठीतही आहेत.)
‘डोंगरदेव : अनुभूतीतून अभ्यास’ हे पुस्तक म्हणजे माझ्या बालपणापासून ते २००० सालापर्यंत ‘भिल’ व ‘कोकणा’ आदिवासींच्या डोंगरदेव उपासना पध्दतीत प्रत्यक्ष स्वत: सामील होऊन स्वअनुभूतीतून- स्वअनुभवातून व नंतर अभ्यास- चिंतनातून लिहिलेलं पुस्तक. ह्या पुस्तकात आदिवासी लोकसंस्कृती, लोकश्रध्दा, आदिम उग्र पूजापध्दती, भाषेतले आदिम हुंकार अधोरेखित करत, मूळ अहिराणी भाषेत आणि मराठीतूनही अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीतून डोंगऱ्या देवाचं आणि त्यांच्या भक्तांच्या आदिम दर्शनासह तात्कालिक जीवन जाणिवांना खोल तळमळीतून भिडण्याचा प्रयत्न केला आहे…