पणजी :
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शपथविधी सोहळ्यावेळी मुकेश अंबानी आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या मागे बसलेले दाखवणाऱ्या फोटोंवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस मीडिया सेलच्या अध्यक्षांनी शिष्टाचार न पाळल्याबद्दल भाजपवर टीका केली.
डॉ. प्रमोद सावंत यांनी शपथविधी सोहळ्याला “मोदींच्या हातचे बाहूले” म्हणून हजेरी लावल्यासारखे दिसते. त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असता आणि “मोदी-शहांच्या इशाऱ्यावर ताल धरला असता तर ते तसे करण्यास ते मोकळे होते. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेचा अनादर करण्याचा अधिकार नाही, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
भाजपचे केंद्रीय नेतृत्व गोव्यातील भाजप नेत्यांना गुलामाप्रमाणे वागवत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी गोव्यातील बहुजन समाजाला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. त्यामुळेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबरीने ज्येष्ठ मंत्री असतानाही श्रीपाद नाईक यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री करण्यात आल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा अनादर करून गोमंतकीयांचा अपमान करणाऱ्या मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या दिल्लीतील कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याबद्दल भाजपने गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.